BREAKING NEWS

logo

किनवट, गेल्या तीन वर्षापासून वारंवार मागणी करूनही शाळेला एक वर्गखोली बांधकाम मंजूर न केल्यामुळे व सध्याच्या गळक्या खोलीच्या दुरूस्तीसाठी निधीही न दिल्याने वैतागलेल्या मलकवाडी ग्रामस्थांनी व शाळा शिक्षण समितीने आज शुक्रवारी (दि.09) शाळेला कुलूप ठोकून गावातील मारूतीच्या पारावर शाळा भरवली.

तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा मलकवाडी केंद्र; चिखली (बु.) येथे या वर्षीची पटसंख्या 51 आहे. मात्र,पहिली ते चौथी पर्यंत चार इयत्तांसाठी एकच वर्गखोली असून, दोन शिक्षक आहेत.पावसाळ्यात सदर खोली पूर्णपणे गळत असते. चारही वर्ग एकाच खोलीत भरत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष शिकविण्याकडे नीट लागत नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम झाल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. गटशिक्षण अधिकारी कार्यालयास याची जाणीव करून देण्यासाठी दि. 04.10.2013, दि. 03.08.2015, दि. 08.06.2015 व दि. 03.06.2016 या तारखेस अर्ज केले असता, गटशिक्षण अधिकार्यांनी केवळ तोंडी आश्वासन दिले होते.  मात्र, प्रत्यक्षात कुठलीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, असे निवेदनात नमूद आहे. नवीन एक वर्गखोलीच्या बांधकामास परवानगी तर दिलीच नाही शिवाय विद्यमान खोली दुरूस्तीसाठी निधीही उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आपल्या पाल्याचे भविष्य अंधारल्या जात असल्याचे पाहून शा.व्य.स.व ग्रामस्थांनी शेवटचे पत्र दि. 04.07.2017 रोजी देऊन आपल्या उपरोक्त न्याय्य मागण्या दि. 07.07.2017 त्वरीत पूर्ण न केल्यास  शाळेला कुलूप लावून दि. 08.07.2017 रोजी  विद्यार्थी व पालकांसह शाळा आपल्या किनवट येथील गटशिक्षण कार्यालयात भरविण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्याचीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी आज शुक्रवारी (दि.07) शाळेला कुलूप लावून शाळा उघड्यावरील मारूतीच्या पारावर भरविली. उद्या शनिवारी (दि.08) विद्यार्थ्यांसह पालकही गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे कळते.    Tags