logo

किनवट, गोकुंदा परिसरात खुलेआम हातभट्टीची दारू विक्री सुरू असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत असून, तरूण वर्ग व्यसनाधीन होत आहे. ही अवैध दारू विक्री त्वरीत थांबवून दारू विक्रेत्यावर कहक कार्यवाही करावी; अन्यथा भाजपच्या वतीने महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे लेखी निवेदन भाजपाचे तालुका सरचिटणीस हौसाजी काकडे यांनी किनवट पोलीस स्टेशनला दिले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, शासनाने राष्ट्रीय तथा राज्य मार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारू दुकानावर निर्बंध घातल्यापासून गोकुंदा परिसरातील खेड्यापाड्यात बेकायदेशीर रित्या हातभट्टीची दारू पाडण्याचा सुळसुळाट झालेला आहे. गेल्या काही दिवसापासून मदनापूर व शनिवारपेठ या ठिकाणी बिनदिक्कतपणे हातभट्टीची दारू विक्री लपून-छपून सुरू आहे. ऑटो, मोटारसायकल अशा वाहनाद्वारे रात्रीच्या वेळी आजबाजूच्या गावात दररोज हजारो रुपयाची दारू विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे येथून किनवट शहरातही मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत आहे. या परिसरातील अवैध हातभट्टीच्या दारू विक्रीकडे पोलीस प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यानेच, दारू विक्रेते फोफावले असा आरोप काकडे पाटील यांनी केला आहे. या दारूमुळे खेड्यापाड्यातील गरीबांचे संसार उध्वस्त होत आहेत तर तरूण वर्ग व्यसनाधीन होत आहे. शिवाय या मद्यपी लोकांमुळे सूज्ञ नागरीकांना तसेच महिलांना प्रचंड त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. बहुतांश दारू विके्रत्यांना पोलीसांचे अभय व स्थानिक राजकीय नेत्यांचा आशिर्वाद असल्याने दारू विक्रेत्यांवर कठोर कार्यवाही होत नाही. देशाचे भवितव्य असलेल्या तरूण वर्गाला व गरीब महिलांचे संसार वाचविण्यासाठी पोलीस प्रशासनाने दारू विक्रेत्यांवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा हौसाजी काकडे पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री यांच्यासह पोलीस अधिक्षक नांदेड व उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट यांना दिल्या आहेत.

    Tags