logo

किनवट, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब (बालाजी) मुरकुटे यांची, तर शहरप्रमुखपदी नगरसेवक सूरज सातुरवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा आनंद शिवसैनिकांनी गोकुंदा व किनवट येथे फटाक्याची आतषबाजी करून व्यक्त केला.

गोकुंदा येथील शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते व पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब मुरकुटे यांच्या तालुकाप्रमुखपदी झालेल्या नियुक्तीने तालुक्यातील शिवसैनिकांत उत्साह तथा जोष संचारला आहे. मागे झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मुरकुटे यांच्या पत्नी गोकुंदा गटातून अत्यल्प मताने पराभूत झाल्या होत्या. बाळासाहेब मुरकुटे यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे. शहरप्रमुखपदी नियक्ती करण्यात आलेले सूरज सातुरवार हे नगरपरिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांचाही शहरातील सर्वच थरातील लोकांत एक मनमिळाऊ व जनहितदक्ष व्यक्तीमत्व म्हणून परिचय आहे. तालुका व शहर प्रमुखांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेला तालुक्यात जबरदस्त चालना मिळणार आहे. मागील कांही वर्षापासून शिवसेनेला आलेली मरगळ झटकल्या जाऊन आता नव्या दमाने शिवसेना तालुक्यात उभी राहील, असे सूचिन्हे आहेत. यामुळे शिवसेनेला आता चांगले दिवस येण्याची परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र दिसत आहे. 

    Tags