logo

BREAKING NEWS

पुतळे उभारण्याबाबत शासनाने अवलंबिले कडक धोरण

किनवट, सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रपुरूष व थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्याबाबत राज्य शासनाने कडक धोरण अवलंबिले असून, त्याची नियमावली जाहीर केली आहे. कायदा व सूव्यवस्था, सार्वजनिक वाहतुकीच्या आड येणार्या पुतळ्यांच्या उभारणीला मनाई करण्यात आली असून, शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय पुतळे बसविल्यास संबंधित व्यक्ती वा संस्थेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

महापुरूषांचे पुतळे उभारण्याबाबत राज्य शासनाने 2005 मध्ये काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यात आणखी सुधारणा करून पुतळे उभारण्याचे धोरण अधिक कडक करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे मंगळवारी एका आदेशाद्वारे त्यासंबंधीचे नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार खाजगी मालकीच्या जागेवर जिल्हाधिकार्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभारता येणार नाही. पुतळा बसविण्याच येणारी जागा अनधिकृत किंवा अतिक्रमित असता कामा नये. तसेच पुतळा उभारल्यामुळे कायदा व सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, जातीय तणाव वाढणार नाही, याबाबत सविस्तर चौकशी करून संबंधित पोलीस कार्यालय प्रमुखाने ना हरकत प्रमाणपत्र प्रस्तावासोबत  जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुतळा उभारणीसाठी अल्पसंख्याक व स्थानिकांचा विरोध नसल्याबाबत स्पष्ट उल्लेख ना हरकत प्रमाणपत्रात असला पाहिजे. पुतळा उभारल्यामुळे वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण होणार नसल्याचे पोलीस विभागाचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे ना हरकत प्रमाणपत्र प्रस्तावासोबत पाठविणे बंधनकारक राहणार आहे.

    Tags