Breaking news

मेंडकी येथे आदिवासी विद्यार्थीनींचे स्नेहसंमेलन रंगले

किनवट(प्रतिनिधी)माहूर तालुक्यातील मेंडकी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित आदिवासी मुलींच्या शैक्षणिक संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी (दि.03) अत्यंत उत्साहात पार पडले.या निमित्ताने छोट्या विद्यार्थीनींनी आपल्या विविध कलागुणांचे दर्शन घडवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळून त्यांचा आंतरीक विकास व्हावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी शिवाजी राठोड होते.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मेंडकीचे सरपंच रामा जंगले यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्तीचे अध्यक्ष आलूसिंग राठोड, देवजी राठोड,वसतीगृह अधिक्षिका अंबिका खरात हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने करण्यात आली.‘देवा श्री गणेशा’ या हिंदी गीतावरील नृत्याविष्काराला प्रेक्षकांनी टाळ्याच्या कडकडाटाने दाद दिली.मराठी लावणी,तेलगु चित्रपट गीते, देशभक्तीपर गीते आदी प्रकार उत्कृष्टपणे सादर करण्यात आले.चिमुकल्यांच्या सहज व सफाईदार अभिनयामुळे प्रेक्षक भावविभोर झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सुनिता विभुते मॅडमनी केले.यावेळी शिक्षकांपैकी प्रमोद राठोड,संदिप राठोड,शिल्पा चव्हाण, स्वाती भोतीकर, भानुप्रकाश उंपलवार,दिनेश राऊतकर,पत्रकार नागभूषण येंबरवार,पालक,विद्यार्थी व गावातील नागरीक उपस्थित होते.

Related Photos