Breaking news

अंबाडीतांडा शिवारात सापडला मादी बिबट्याचा मृतदेह.. मेला की मारल्या गेला

किनवट(अरुण तम्मडवार)तालुक्यातील अंबाडी तांडा शिवारात तीन वर्षीय मादी बिबटाचा थोडासा सडलेला मृतदेह सापडला असून,पशूवैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक अंदाजानुसार तो पाण्यात बुडून मेल्याचे सांगितले. विशेष म्हणजे बिबट्याचे चारही पंजे व तोंडातील सुळे कुणीतरी काढून घेतल्याचे दिसत असल्याने,तो अपघाताने मेला की मारल्या गेला हे अजून उलगडलेले नाही.

गेल्या तीन-चार दिवसापूर्वी अंबाडीतांड्या शेजारच्या जंगलात वणवा पेटला होता.त्यामुळे त्यापासून बचाव करत पाण्याच्या शोधार्थ तो वस्तीकडे येतांना विहीरीत पडून मेला असावा;असा कयास वनविभागाकडून बांधल्या जात आहे. अंबाडीतांडा शिवारातील अनिल किशन राठोड या शेतकर्‍याला आपल्या शेतातील विहीरीपासून सुमारे शंभर फूट अंतरावर एका मादी बिबट्याचे कलेवर आज रविवारी (दि.05) आढळून आले.ही बाब त्याने तात्काळ वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना भ्रमनध्वनीवरून कळविली.त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी जे.डी.पल्लाड,विभागीय व्यवस्थापक व्हि.एन.पुनसे,सहाय्यक व्यवस्थापक एस.बी.आडे व वनपाल पी.पी.यशवंतकर हे तात्काळ घटनास्थळी पोहाचून तपासणी केली.मलकापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.ए.एस.कचरे व पशुधन विकास अधिकारी डॉ.पी.एन.निकम यांनी बिबट्याच्या मृतदेहाचा पंच उत्तम चव्हाण,प्रेमसिंग जाधव व पोलीस पाटील बाशिद पटेल यांच्या समक्ष पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन केले.त्यातील प्राथमिक अहवालानुसार बिबट हे मादी जातीचे असून,तीन वर्षाचे आहे.मृत्यूपूर्वी त्याने डुक्कर खाल्ल्याचे त्याच्या जठरातील अवशेषावरून दिसून येत होते.त्याची तोंडापासून शेपटाच्या टोकापर्यंत लांबी मोजली असता 1.10 मिटर भरली.पंच,वनअधिकारी व ग्रामस्थांसमक्ष त्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करण्यात आला.पुढील तपास चालू असून,या सर्व कार्यवाहीच्या वेळी फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.बी.संदुपटलवार,वनरक्षक एस.यु. काळेवार, एस.आर.शिवाळे,एस.एम.शेख,एस.एन.नागरगोजे,वाहनचालक एस.बी.मोरे व ए.आर. शिर्षे हेही उपस्थित होते.

मागेही तालुक्यात दोन-तीन अस्वलांचे मृतदेह आढळून आले होते.त्यांचेही पंजे,लिंग व सुळे कापलेल्या अवस्थेत होते.एक अस्वल तर घोटी शिवारातील एका शेताच्या तारकुंपणात विद्युतप्रवाह सोडल्यामुळे त्याचा जबर धक्का बसून मेला होता.या मयत बिबट्याचेही चार पंजे कापण्यात आले होते व सुळेही नव्हते. त्यावरून वन्यपशूंचा तस्करीसाठी घात तर केल्या जात नाही ना? अशी शंका नागरिकांत व्यक्त होत आहे.

Related Photos