Breaking news

निकृष्ट रस्त्याच्या संदर्भात मनसेने केले रास्ता रोेको आंदोलन

किनवट(प्रतिनिधी)शहरातील शिवाजी पुतळा ते उर्दु शाळेपर्यंत तयार करण्यात आलेला सिमेंट रस्ता अतिशय निकृष्ट तयार करण्यात आला आहे. या रस्त्याची गुण नियंत्रण कक्षामार्फत चौकशी करून कंत्राटदारासह संबंधित अधिकारी व अभियंता यांच्यावर दखलपात्र कार्यवाही करावी; तसेच कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे,या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी (दि.सहा) नगरपरिषद कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या संदर्भाने नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना व सर्व संबंधितांना मनसेने दि.03 रोजी निवेदन दिले होते. या दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की, सिमेंट रस्त्याचे काम कंत्राटदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे केले नाही. या रस्त्याचे खोदकाम न करताच सरळ गिट्टी टाकून व त्यावर सिमेंटचा अल्पथर देऊन काम पूर्ण केले आहे. रस्त्याचे काम पूर्ण होऊन महिना लोटण्यापूर्वीच जागोजागी सिमेंट उखडून खड्डे तयार झाले आहेत. शिवाय सिमेंट रस्त्यासाठी पाण्याचा अल्प वापर केल्याने रस्ता कोरडा होऊन प्रचंड धूळ निर्माण होत आहे.

या सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट बांधकामास कंत्राटदार व नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी व कनिष्ट अभियंता हेच जबाबदार असून, त्यांनीच संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदन देऊनही या रस्ता कामाची चौकशी न झाल्याने मनसे च्या वतीने रास्ता रोको आंदोलन आज सोमवारी करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे तालुकाध्यक्ष नितीन गणेश मोहरे, शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांच्यासह शेख अजहर शेख शफी व इलीयास चौधरी (बागवान) यांनी केले. आंदोलनात मनसेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी रास्ता रोको स्थळी येऊन निवेदन स्विकारले.

दरम्यान, काम दुरूस्त करून देण्यासाठी कंत्राटदारास नोटीस बजावली असून, कंत्राटदाराने दोन दिवसाच्या आत दुरूस्तीचे काम हाती घेणार असल्याची हमी दिलेली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी दिली. निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याच्या संदर्भाने पुढच्या बुधवारी (दि.15) नगर परिषदेचे उपाध्यक्ष अभय भीमराव महाजन, नगरसेवक इस्तारी माडपेल्लीवार व नगरसेवक कृष्णा व्यकंटराव नेम्मानीवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बेमुद्दत उपोषणाला बसणार आहेत.त्यांच्या मागण्यांना विद्यमान सहा नगरसेवकांनी समर्थन दिले आहे.या रस्त्याच्या कामावरून शहरातील वातावरण चांगलेच तापत आहे.या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, यासाठी कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका नुकतीच दाखल केली आहे.

Related Photos