जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेचा ‘मलबा’ चोरण्याचा प्रयत्न फसला

किनवट(अरुण तम्मडवार)जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेची इमारत पाडून त्या जागेवर किनवट नगर परिषदेच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. कन्याशाळेच्या इमारतीचा निघालेला ‘मलबा’ संबंधित गुत्तेदाराची माणसे चोरून नेत असतांना पहाणार्‍यांनी अडविले असता; त्यांना ‘लक्ष्मीदर्शन’ करवून पुढे जाण्यात चोरटे यशस्वी झाले.मात्र,कांही जागृत नागरिकांनी पोलीसांच्या माध्यमातून हा पळवलेला ‘मलबा’ परत जागेवर आणून टाकावयास लावल्याची चविष्ट चर्चा शहरात चालू आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,जि.प.ची किनवट शहरात कन्या शाळा असून,तिच्या तीन इमारती होत्या.त्यातील एक इमारत विना परवानगी पाडून त्या जागेवर न.प.ने नूतन इमारतीचे बांधकाम चालू केले.पाडलेल्या शाळा इमारतीच्या निघालेल्या मलब्यात लोखंडी टीनपत्रे,खिडक्या-दरवाजे व लाकूडफाटा याचा समावेश आहे. हा ‘मलबा’ शुक्रवारी (दि.03) न.प. इमारतीचे बांधकाम करणार्‍या गुत्तेदाराचे हस्तक चोरून घेऊन जात असल्याचे कांहीना समजल्यावर त्यांनी अडवणूक करून माया प्राप्त केली अन्‌ ‘मलबा’ जाऊ दिला. त्यानंतर ही हकीकत शहरातील जागृत नागरिकांना कळाली.त्यांनी तात्काळ ही बाब पोलीसांना कळविली.मग मात्र बदनामी टाळण्यासाठी या प्रतिष्ठित गुत्तेदाराने साळसूदपणे हा सर्व ‘मलबा’ जशाच्या तसा परत बांधकाम परिसरात आणून टाकला.सकाळी ही खबर वार्‍यासारखी शहरात पसरली.तेव्हापासून हा तथाकथित संभावित लोकसेवक रक्तदाब वाढल्याचे कारण पुढे करून शहराबाहेर गेल्याचे कळते.

जि.प.प्रशासनाची कसलीही परवानगी न घेता कन्याशाळेच्या उर्वरीत इमारती पाडून टाकण्याचा प्रयत्न न.प.कडून केल्या जात आहे.सोबतच कन्याशाळेचे निघालेले सर्व जुने सामान अर्थात लोखंडी टीनपत्रे,गजाळ्या,दरवाजे,खिडक्या व शिवारफाटा असा मलब्यातील काही भाग हे चोरटे पळविण्यात यशस्वी झालेत.ते सर्व साहित्य लोकसेवकाच्या स्वत:च्या शाळेसाठी वापरले जात असल्याचीही नागरिकांत चर्चा आहे. तालुक्यात एकमेव असलेली जि.प.ची कन्याशाळा जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न हाणून पाडून पूर्ववत येथील शाळा नावारूपाला आणावी अशी पालकवर्गातून मागणी होत आहे.

या बाबत गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांचेशी संपर्क साधला असता,कन्या शाळेची इमारत खाली करा म्हणून नगर परिषद किनवट आम्हाला वारंवार पत्र देत आहे.परंतू,जिल्हास्तरीय अधिकार्‍यांचे एकही पत्र आम्हाला आले नाही.म्हणून आमचे पुनर्वसन कोठे होणार हे ठरल्यानंतर व तसा आदेश आल्यानंतरच आम्ही जागा सोडूत असे सांगितले.

Related Photos