दर्जाहीन रस्त्याचे बांधकाम शिवसेनेने बंद पाडले

किनवट(प्रतिनिधी)निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्ते बांधकामांसाठी चर्चेत असलेल्या किनवट न.प.कडून शिवाजी नगर भागात माती मिश्रित रेती, अत्यल्प प्रमाणात सिमेंट व गजाळी विरहित सिमेंट रस्त्याचे होत असलेले हीन दर्जाचे बांधकाम शिवसेनेचे तालुका संघटक युवानेते विलास गोनेवार यांनी आज कामास प्रत्यक्ष भेट देऊन बंद पाडले.

शहरातील शिवाजी चौक ते हनुमान मंदीर ते उर्दु शाळा हा रस्ताही अत्यंत निकृष्ट दर्जेचा झाल्याने ते प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. त्यामुळे किनवट नगरपरिषदेचा ‘लौकिक’ प्रसार माध्यमांच्याद्वारे संपूर्ण मराठवाड्यात पसरला; तरी सुद्धा निबर झालेल्या प्रशासनास जाग आलेली दिसत नाही. शहरातीलच शिवाजीनगर भागात निकृष्ट दर्जाचे काम सुरू असलेली तक्रार स्थानिक शिवसैनिकांनी तालुका संघटक विलास गोनेवार यांचेकडे घेऊन आलेत. युवानेते गोनेवार यांनी आज गुरूवारी (दि.09) सकाळी प्रत्यक्ष या कामास भेट दिली असता;त्यांना आश्र्चर्याचा धक्काच बसला.कामावर मातीमिश्रित रेती स्वच्छ न करताच वापरात येत होती.सिमेंटचे अत्यल्प प्रमाण व विना गजाळीचे फक्त दोन इंच जाडीचा थर रस्त्यावर टाकण्यात येत होता.अधिक माहिती घेतली असता सदरचे काम नगरसेवकच करीत असल्याचे सांगण्यात आले, अशी माहितीसुद्धा विलास गोनेवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.

किनवट न.प. मधील बहुतांशी कामे नगरसेवक व त्यांचे नातेवाईकच करीत असल्याने कामांना दर्जाच नसतो.न.प. प्रशासन नगरसेवकांकडून दर्जेदार कामे करून घेऊच शकत नाही. त्यामुळे कामाचा दर्जा वाढण्यासाठी न.प.ची सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावीत;अशी मागणी सुद्धा विलास गोनेवार यांनी केली आहे.

Related Photos