किनवट पंसच्या सभापतीपदी भाजपाच्या राठोड तर उपसभापतीपदी शिवसेनेचे कोल्हे

किनवट(अरुण तम्मडवार)नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पंचायत समिती किनवटच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या सौ.कलाबाई नारायण राठोड तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गजानन विठ्ठल कोल्हे हे विजयी झाले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली पंचायत समिती भाजप-शिवसेना युतीच्या ताब्यात आल्याने तालुक्यातील युतीच्या कार्यकर्त्यांत चैतन्य संचारले आहे.विजयानंतर सभापती व उपसभापतीची विजयी मिरवणूक युतीच्या कार्यकर्त्यांनी जोशात काढली.

किनवट पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड करण्याकरीता पं.स.च्या नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक मंगळवारी (दि.14) पंचायत समितीच्या सभागृहात अध्याशी अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.किनवट पं.स.मध्ये एकूण 12 पंचायत समिती सदस्यांपैकी भाजपाचे 6,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 3 तर भारतीय कॉंग्रेस,शिवसेना व भारिप बहुजन महासंघाचा प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे.

सभापतीपदा साठी भाजपाकडून सौ.कलाबाई नारायण राठोड तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सत्यभामाबाई गोविंदराव मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.उपसभापती पदासाठी शिवसेनेचे गजानन कोल्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरेखा सुभाष वानोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.मतदान प्रक्रियेत कॉंग्रेसच्या पं.स.सदस्या मेहरूनबी शेख जाफर या तटस्थ राहिल्या तर भारिप बहुजन महासंघाच्या पं.स.सदस्या सौ.हिराबाई लक्ष्मण आडे या अनुपस्थित होत्या.त्यामुळे उर्वरीत दहा सदस्यांनी केलेल्या मतदानात सात मते अनुक्रमे भाजपाच्या कलाबाई राठोड यांना सभापतीपदासाठी व शिवसेनेच्या गजानन विठ्ठल कोल्हे यांना उपसभापतीपदासाठी पडल्याने त्यांना अध्याशी अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी विजयी घोषित केलेे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना त्यांच्याच सदस्यांची फक्त तीन मते पडली होती.पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी भाजपाला अवघ्या एका सदस्याच्या पाठिंब्याची गरज होती.त्यामुळे शिवसेनेच्या गजानन कोल्हेंना उपसभापतीपद देऊन त्यांचा पाठिंबा मिळविल्याने कोणतेही नाट्य न घडता भाजपाला सहजपणे किनवट पं.स.वर आपला झेंडा रोवता आला.या निवडणूक प्रक्रियेत सचिव तथा गटविकास अधिकारी दिलीप इंगोले,नायब तहसीलदार महमंद अजिमोद्दीन व संजय भोसीकर,संजय बिर्‍हाडे,एन.पी.शिंदे,शेख लतीफ यांचा सहभाग होता.

भाजपाने मिळविलेल्या या यशावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपा नेते अशोक पाटील सूर्यवंशी म्हणाले की,भाजपा सर्वच जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा व विकासासाठी कायम झटणारा पक्ष असल्याने,राज्यात व देशातही सर्वत्र आमचा विजय होत आहे.केंद्रात व राज्यात भाजपाचीच सत्ता असल्याने पंचायत समिती अंतर्गत विकास कामांना त्यामुळे अधिक गती मिळणार आहे.किनवट पंचायत समिती ताब्यात घेतल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोषात आपला आनंद व्यक्त केला आणि विजयी मिरवणूक काढली.

या प्रसंगी माजी मंत्री डी.बी.पाटील,सुरेश रंगेनवार,निरंजन सूर्या,तालुका अध्यक्ष श्याम केंद्रे,शहर अध्यक्ष सतिश बिराजदार,अशोक नेम्मानीवार,जि.प.सदस्य सूर्यकांत अरंडकर,सौ.कमल हुरदुखे, पं.स. सदस्य निळकंठ कातले,सत्यनारायण संकुरवार,इंदलसिंग राठोड,माधव डोखळे,कपिल करेवाड, संतोष चनमनवार, नामदेव केंद्रे गरूजी,मनोहर ताटे,हौसाजी काकडे,सतिष बोंतावार,अमरदीप कदम,रवी श्रीनेवार, पद्माकर आरसोड,लालीसेठ सोखी,जयवंत बोंबले,रामकिशन केंद्रे,प्रल्हाद दराडे,किशन शिंदे, बालाजी धोतरे,सतिश चव्हाण,गजानन आरमाळकर,बबन वानखेडे,प्रफुल्ल उपलेंचवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Photos