Breaking news

उपाध्यक्षांसह दोन नगरसेवकांनी प्रारंभिले पाच मागण्यांसाठी आमरण उपोषण

किनवट(अरुण तम्मडवार)शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी पुतळा ते हनुमान मंदिर व हनुमान मंदिर ते उर्दु शाळा या दोन्ही सिमेंट कॉंक्रिट रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालीत. ती नव्याने दर्जेदार करून या भ्रष्टाचारास कारणीभूत मुख्याधिकारी व अभियंत्यास त्वरीत निलंबित करून त्यांच्या व गुत्तेदाराच्या मालमत्तेतून अपहारीत रक्कम जप्त करून पोलिसांत गुन्हे दाखल करा. या प्रमुख मागण्यांसह इतर दोन मागण्यांसाठी न.प.किनवटचे उपाध्यक्ष अभय महाजन,नगरसेवक इस्तारी माडपेल्लीवार व नगरसेवक कृष्णा नेम्मानीवार या तिघांनी न.प.कार्यालयासमोर आज बुधवार (दि.15) पासून आमरण उपोषणास प्रारंभ केले असून,न.प.च्या इतर सहा नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

दि.04 मार्च रोजी दिलेल्या निवेदनातून एकूण पाच मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात उपरोल्लेखित दोन्ही निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ते नव्याने दुरूस्त करून दर्जेदार करणे,निकृष्ट रस्त्यास कारणीभूत व्यक्तींविरुद्ध जनता व सरकारचा विश्र्वासघात,निधीतील भ्रष्टाचार आदी आरोपांखाली त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत. सदर कामात झालेल्या अपहारीत रक्कमेची भरपाई त्यांच्या खाजगी मालमत्ता व वेतनातून करून घेण्यात यावी.नागरिकांच्या मालमत्तेवर लावलेल्या ‘जिजिया’ करावरील व्याज माफ करण्यात यावा आणि सार्वजनिक नळ योजनेतून अशुद्ध,जंतू व विष्ठायुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे; याविषयी चौकशी करून त्वरीत पिण्याचे शुद्ध पाणी नळाद्वारे शहरवासियांना उपलब्ध करून द्यावे,या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी किनवट न.प.समोर उपाध्यक्ष अभय महाजन,नगरसेवक इस्तारी माडपेल्लीवार व कृष्णा नेम्मानीवार यांनी आज बुधवारपासून आमरण उपोषणास सुरूवात केली.किनवट न.प.मध्ये आ.प्रदीप नाईक यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असून,सतरा नगरसेवकांपैकी रा.कॉं.चे आठ,कॉंग्रेसचे चार,शिवसेनेचे चार व एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे.न.प.मध्ये आघाडीची सत्ता असतांनाही सतरापैकी नऊ नगरसेवक या उपोषणाच्या पक्षात आहेत.

‘‘अध्यक्ष व मुख्याधिकारी कर्मचार्‍यांना हाताशी धरून एकतर्फी कारभार करीत आहेत.सभागृहात सदस्यांना बोलू दिल्या जात नाही.त्यांचे विषय सभेत चर्चेला घेतल्या जात नाहीत.सर्वसाधारण सभा केवळ दहा मिनिटात संपविल्या जाते.त्यामुळेच उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.’’

Related Photos