नगरसेवकाच्या शाळेला न.प.प्रशासनाकडून सील

किनवट(अरुण तम्मडवार)उपोषणकर्ते नगरसेवक तथा सरस्वती विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णकुमार नेम्मानीवार यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिल्यामुळे, न.प.प्रशासनाने काल शुक्रवारी (दि.17) त्यांच्या सोनारगल्ली भागातील शाळेला कराची थकबाकी भरले नसल्याच्या कारणावरून सील ठोकले. त्यामुळे आज शनिवारी (दि.18) ही शाळा न.प.च्या प्रांगणातच भरली. हा किनवटच्या इतिहासातील पहिलाच प्रकार असल्याने शहरात कुतुहलाचा विषय बनला आहे.

दि.17 रोजी न.प.कडून आमरण उपोषण मागे घेण्याबाबतचा मध्यस्थांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यात ठोस आश्वासन नसल्याने उपोषणकर्त्यांकडून नकार देण्यात आला. त्यानंतर लागलीच पुढच्या प्रहरात न.प.प्रशासनाने सोनार गल्ली भागातील सरस्वती विद्या मंदिर शाळेला सील ठोकले. उपोषणकर्ते नगरसेवक कृष्णकुमार नेम्मानीवार हे त्या शिक्षण संस्थेचे सचिव आहेत. त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा एक प्रयत्न होता अशी नागरिकांत चर्चा होती. आज शनिवारी शाळेला कुलुप असल्याने पालकांच्या आग्रहास्तव शिक्षिकांनी सकाळी ही शाळा नगर परिषदेच्या प्रांगणातच भरविली. न.प.च्या आवारातील भरलेली शाळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. किनवटच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच घडल्याने हा विषय शहरात चर्चिल्या जात आहे.आज शनिवार असल्याने अर्ध्या दिवसाची शाळा सुटली. उद्या रविवारी सुट्टी आहे. सोमवारी परत न.प. प्रांगणातच शाळा भरते की नाही हे पाहण्यासाठी शहरवासी उत्सुक आहेत.

Related Photos