Breaking news

किनवट उपविभागात 2 कोटी 40 लक्ष रुपयांची थकबाकी...175 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

किनवट (अरुण तम्मडवार) आर्थिक डबघाईस आलेल्या महावितरणने थकबाकीदार वीज ग्राहकांचा सातत्याने पाठपुरावा करूनही वसुलीसाठी जेरीस आणणार्‍या वीजग्राहकांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. किनवट उपविभागांतर्गत थकबाकी न भरणार्‍या सुमारे 175 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, वसूलीचे उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत हे खंडितसत्र चालू ठेवण्याचा निर्धार आहे. त्यामुळे ही कटू कार्यवाही टाळण्यासाठी वेळेत वीजदेयके भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन येथील उप-कार्यकारी अभियंता व्ही.बी.चव्हाण यांनी केले आहे.

किनवट उपविभाग अंतर्गत महावितरण कंपनीचे घरगुती व व्यावसायिक मिळून 23 हजार 195 ग्राहक असून,त्यांच्याकडे व्ही.एल.जी.रिपोर्टनुसार 227 लक्ष रुपयाची थकबाकी आहे.औद्योगिक ग्राहक 373 असून,त्यांच्याकडे 12.81 लक्ष रुपयांची थकबाकी आहे.घरगुती,व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची मिळून एकूण थकबाकी 239.81 लक्ष रुपये आहे. यात किनवट शहराचे घरगुती व व्यावसायिक ग्राहक 8 हजार 181 आणि औद्योगिक ग्राहक 97 असे एकूण 8 हजार 277 ग्राहकांची एकूण थकबाकी 84 लक्ष रुपये अंतर्भूत आहे.

यंदा महावितरणच्या थकबाकीचा आकडा मोठा आहे;शिवाय महावितरण आर्थिक संकटातून जात असल्याने थकबाकी कमी करावे असे आदेश वरिष्ठ कार्यालयातून आले आहेत.किनवट उपविभागाची मार्च 2016 अखेरची थकबाकी 185 लक्ष रुपये होती.किमान त्या स्थितीखाली तरी या वर्षीचा आकडा यावा असे उद्दीष्ट देण्यात आले आहे.यावर्षीची एकूण थकबाकी 239.81 लक्ष रुपयातून गतवर्षीची थकबाकी 185 लक्ष वजा केले असता,54.81 लक्ष रुपये उर्वरीत थकबाकी व त्यात चालू मार्च 17 ची मागणी देयकांची रक्कम 104.25 लक्ष रुपये असे एकूण 159.06 लक्ष रुपये वसूल करणे यंदाचे उद्दीष्ट आहे.त्यापैकी 17 मार्च 2017 अखेर सुमारे 70 लक्ष रुपयांची वसूली दररोज परिश्रमपूर्वक फिरून वसूल करण्यात आली आहे.आजपासून 31 मार्च 2017 अखेर उर्वरीत 89.06 रुपयांची वसूली करणे अनिवार्य असून, येथील महावितरणसाठी ते मोठे आव्हान आहे.‘प्रकाशगड’ कडूनच आदेश असल्याने उप-कार्यकारी अभियंता व्ही.बी.चव्हाण व त्यांचे सहकारी सहाय्यक अभियंता दिलीप राठोड यांनी विश्र्वासपूर्वक सांगितले की, मागील मार्च 2016 ची जी स्थिती होती ते उद्दीष्ट असले तरी आम्ही त्याच्या खाली येऊन थकबाकी शून्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत.आम्ही स्वत: व वीज कर्मचार्‍यांच्या पथकाने मोहीम तीव्रतेने गतीमान केलेली आहे आणि आमचे उद्दीष्ट गाठण्यात निश्र्चितच सफल होऊत असा विश्र्वास उभयतांनी व्यक्त केला.

Related Photos