प्रशासनाच्या लेखी आश्र्वासनामुळे नगरसेवकांचे आमरण उपोषण सुटले.

किनवट(अरुण तम्मडवार)शिवाजी पुतळा ते हनुमान मंदिर व हनुमान मंदिर ते उर्दुशाळा या दोन सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांच्या दर्जाची सखोल चौकशी व तपासणी भोकर येथील सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता यांचे अध्यक्षतेखालील पथक करणार असून, तपासणीअंती दोषी आढळलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यावरून न.प.किनवट समोर गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले उपाध्यक्षांसह दोन नगरसेवकांचे आमरण उपोषण डॉ.राजेंद्र भारूड यांच्या हस्ते शितपेय देऊन सोडविण्यात यश आले.

किनवट न.प.चे उपाध्यक्ष अभय महाजन,नगरसेवक कृष्णकुमार नेम्मानीवार व नगरसेवक इस्तारी माडपेल्लीवार यांनी शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी पुतळा ते हनुमान मंदिर व हनुमान मंदिर ते उर्दुशाळा ह्या दोन्ही सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाल्याने त्याची चौकशी करून दोषींविरुद्ध पोलीसात गुन्हे दाखल करण्यात यावेत यासह मालमत्तेवरील लावलेल्या जिजिया करावरील व्याज माफ करण्यात यावे व नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी नळयोजनेद्वारे पुरविण्यात यावे ह्या मागण्यांना घेऊन न.प.समोर बुधवार (दि.15)पासून आमरण उपोषणास प्रारंभ केला होता.

दरम्यान,जाहीर हस्त पत्रके, प्रतिउपोषण, महिलांचे लाक्षणिक उपोषण, रास्ता रोको नोटीस, शहर बाजारपेठ बंद, सोशल मिडियावर आरोप-प्रत्यारोप, पत्रकार परिषदा यामुळे गेल्या पाच दिवसात शहरातील वातावरण पार ढवळून निघाले होते. उपोषणाच्या पाचव्या दिवशी अर्थात आज सोमवारी (दि.20) सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी उपोषण मंडपास भेट देऊन उपरोल्लेखित लेखी आश्र्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांचे समाधान होऊन त्यांनी उपोषण थांबविले. उपोषणकर्ते नगरसेवक कृष्णकुमार नेम्मानीवार हे ज्या शाळेचे सचिव आहेत त्या सोनार गल्लीतील सरस्वती विद्या मंदिर शाळेला न.प.ने लावलेले टाळे विद्यार्थ्यांची परीक्षा कालावधी लक्षात घेऊन त्वरीत उघडण्यात येईल व दुसरे उपोषणकर्ते नगरसेवक इस्तारी माडपेल्लीवार यांच्या मालमत्तेविषयी न.प. सभागृहात निर्णय होईपर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात येणार नाही असे आश्वासन डॉ.भारूड यांनी दिले.

डॉ.भारूड यांनी स्वत:च्या हस्ते उपोषणकर्त्यांना शितपेय पाजवून उपरोक्त आश्र्वासन दिल्याने अखेर उपोषणाची सांगता झाली. या वेळी मंडपात भाजपाचे प्रदेश सदस्य सुधाकरदादा भोयर,भारिपचे तालुका अध्यक्ष सुरेश जाधव,मनसेचे तालुका अध्यक्ष नितीन मोहरे,महिला प्रतिनिधी श्रीमती सुरेखा काळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.एल.कागणे,युवानेते संदिप केंद्रे,अभय नगराळे,नायब तहसीलदार गोंड,पोलीस निरीक्षक डॉ.अरूण जगताप,यांचेसह प्रमुख पत्रकार,व्यापारी,नगरसेवक,प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने हजर होते.

Related Photos