किनवट नगर पालिका बरखास्त करण्याची शहर भाजपाची मागणी

किनवट(प्रतिनिधी)किनवट नगरपरिषदेतील नगरसेवक, मुख्याधिकारी व अध्यक्ष यांच्या अंतर्गत वादामुळे 1 कोटी 63 लक्ष रुपयांची विकासकामे खोळंबली आहेत. अशातच शहरातील दोन सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट बांधकामावरून न.प.उपाध्यक्ष व दोन नगरसेवकांनी सलग पाच दिवस उपोषण करून प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवकांच्या या अंतर्गत वादातून नगरपालिकेची निष्क्रीयता व भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला असून, जनतेच्या हितार्थ तसेच पावसाळ्यापूर्वी सिमेंट रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी ही नगर पालिका बरखास्त करून उर्वरीत कालावधीसाठी प्रशासकाची नेमणूक करावी; असे लेखी निवेदन भाजपाचे शहराध्यक्ष सतिश बिराजदार यांनी नांदेडच्या जिल्हाधिकार्‍यांना सोमवारी (दि.20) दिले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, किनवट नगर पालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून आदिवासी विकास योजना, दलितवस्ती सुधार योजना या शिर्षकाखाली मोठ्या प्रमाणात निधी मिळत असतो. मागील चार वर्षाच्या कार्यकाळात अध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी व गुत्तेदार यांच्या आर्थिक हितसंबंधामुळे व टक्केवारीच्या धोरणामुळे विकासकामात अनियमितता होऊन कामे दर्जाहीन होत आहेत. कामाची मुदत संपण्यापूर्वीच कामाची देयके अदा करून विकास निधीची लूट केली जात आहे.बहुतांश कामे कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दर्शवून परस्पर निधीची उचल करून प्रशासनासह शहरवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार गेल्या चार वर्षापासून सुरू आहे.मालमत्तेवरील प्रचंड करवाढ, शहरातील अतिक्रमण व विकास निधीतील अपहारास पालिका प्रशासन व पदाधिकारीच जबाबदार आहेत असा आरोप निवेदनात केलेला आहे.

शहराच्या विकासासाठी दहा महिन्यापूर्वी किनवट नगर परिषदेचा जवळपास 1 कोटी 63 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला. यात विविध प्रभागातील सिमेंट रस्त्यांचा समावेश असून, केवळ नगर पालिकेतल्या अंतर्गत वादामुळे आजपर्यंत केवळ दोनच सिमेंट रस्ते हाती घेण्यात आले. शिवाजी चौक ते हनुमान मंदिर व हनुमान मंदिर ते उर्दुशाळा हेच ते दोन रस्ते अत्यंत दर्जाहीन बांधल्याने शहरवासी संताप व्यक्त करीत आहेत. या रस्त्याच्या निकृष्ट बांधकाम प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी घेऊन उपाध्यक्षांसह अन्य दोन नगरसेवकांनी नगर परिषदेसमोर सलग पाच दिवस उपोषण केले. निकृष्ट रस्ता बांधकामाची 80 टक्के रकमेची देयके ठेकेदाराला का दिली? असा प्रश्र्न उपस्थित होत असून, या कामात नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी, अभियंता व काही नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. प्रशासन व नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळे विकासकामांना खीळ बसून कायदा व सूव्यवस्था भंग पावत आहे. या वादातून नगरपरिषदेची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आल्याने ही नगरपालिका बरखास्त करून या ठिकाणी उर्वरीत कालवधीसाठी प्रशासक नेमावा. तसेच पालिकेच्या मागील चार वर्षाच्या भ्रष्ट कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी शहर भाजपाने केली आहे. निवेदनावर भाजपा शहराध्यक्ष सतिश बिराजदार, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष चनमनवार, सतिश नेम्मानीवार, भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष अमरदीप कदम, जयपाल जाधव, बबन वानखेडे, जसबीरसिंग सोखी, सागर पिसारीवार, मनोहर ताटे, शहर उपाध्यक्ष नरसिंग तक्कलवार, बालाजी धोत्रे, गजानन अरमाळकर, किशन कर्‍हाळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Photos