BREAKING NEWS

logo

नांदेड, थकित पाच महिन्याच्या वेतनापैकी दोन महिन्याचे वेतन तात्काळ अदा करण्यात येईल, हजेरी कार्ड, ओळखपत्र व आठवडी सुट्टी या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचे आश्वासन मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी दिल्यानंतर कंत्राटी सफाई कामगारांनी पुकारलेला बेमुदत संप गुरुवार (ता.13) पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. 

कर्मचार्‍यांप्रमाणेच थकित वेतन तात्काळ अदा करावे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी या व इतर मागण्यांसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या लाल बावटा संघटनेने सोमवारी  संप पुकारला होता. शेकडो कामगारांनी ट्रॅक्टर डिझेल भरणे अडवल्याने मनपा प्रशासनाचे धाबे दणाणले. दरम्यानच्या काळात नागरी विकास कृती समितीचे माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. आयुक्तांनी मंगळवारपर्यंत थकित वेतनातील दोन महिन्याचे वेतन अदा केले जाईल, आठवडी सुट्टी, हजेरी कार्ड, ओळखपत्र या मागण्या तात्काळ मान्य करण्यात आल्या असल्याचे  सांगितल्यानंतर सफाई कामगारांनी आपला संप तात्पुरता स्थगित केला. बुधवारपर्यंत पगारी नाही झाल्या तर गुरुवार (दि.13) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी एका बैठकीत दिला आहे. या वेळी नांदेड मनपातील कंत्राटी सफाई कामगारांनी आज थकीत पाच महिन्याचा पगार व इतर मागण्यांसाठी संप पुकारला होता. शहरातील चौधरी पेट्रोलपंपासमोर सर्व कामगार एकत्र झाले होते. या वेळी माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे, कामगार नेते कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. के.के. जांबकर, प्रा. लक्ष्मण शिंदे, ऍड. धोंडीबा पवार, प्रा. भोपाळकर, सूर्यकांत वाणी,  गजानन रासे आदींनी कामगारांची भेट घेऊन मार्गदर्शन केले.  
 

    Tags