logo

BREAKING NEWS

दिलीप धोंडगे यांच्या मन्याडी हिसक्याने भाजपा पुरती घायाळ

नांदेड, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांना ‘साले’ संबोधून जे शेतकरी विरोधी वक्तव्य केले त्यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोंडगे यांनी ‘मन्याडी’ भाषेत हिसका दाखविला. तोंडाला काळे फासलेले बॅनर आणि दानवे यांच्या पोस्टरवर जाहीररित्या जोडेमारो आंदोलन केले. दानवेंचे तोंड काळे करणार्‍यांना पाच लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले. या आंदोलनाची राज्य पातळीवर नोंंद घेण्यात आली. जिल्ह्यात भाजपचे खंडीभर व मातब्बर नेते असतानाही कोणीच पुढे येऊन या कृतीचा विरोध केला नाही. मन्याडी हिसक्यामुळे भाजप घायाळ झाल्याचा संदेश संपूर्ण जिल्ह्यात गेला. सत्ताधार्‍यावर विरोधी पक्षाचा युवक नेता वरचढ झाला. अशी चर्चा राजकीय गोटात सुरु होती.

आम्ही काय सोन्याच गाव मांगुन रायलो...
 सोन्यासारख्या पिकाले भाव मांगुन रायलो....
 देव केला तुले बाबा दानव काहून झाला...
 लक्षात ठीव पुढच्या खेपी आमच्याशीच पाला...
 असा नको बोलु राजा जरा सावर बाबू....
 तुले मले पोसणारं असतं वावर बाबू...
 सत्ता आज हाय उद्या राहणार नाई...
 खुर्ची गेल्यावर मंग बाबु कोणी पायणार नाई...
 तोंडाचा जरा जपून वाजवावा बाजा...
 शब्दाची जखम मोठी गहरी होते राजा...

ही वर्‍हाडी भाषेची ‘साले’ नावाची कविता सोशल मिडियात गाजत असताना दुसरीकडे  दिलीप दादांच्या दानवेंच्या तोंडाला ‘काळं फासण्यासाठी’ पाच लाखाच्या बक्षीसान अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. जिल्हा परिषदेच्या आवारात दानवे यांचे होल्डींग लावण्यात आले. पोस्टरला खेटर मारो आंदोलन झाले. परंतु सत्ताधारी भाजपाचा एकही कार्यकर्ता विरोधासाठी पुढे आला नाही. कंधार शहरात जाहीररित्या होल्डींग लावली परंतु बहाद्दरपुरा व्हाया पानभोसी-ते नांदेड राजेंद्रनगरापर्यंत एकाही प्रमुखांनी प्रदेशाध्यक्षांची होणारी मानहानी टाळण्यासाठी रस्त्यावर उतरणे पसंत केले नाही.

दिलीप धोंडगे या युवा नेतृत्वाच्या कल्पक आंदोलनामुळे कॉंग्रेसच्या आंदोलनाची हवा फिकीच पडली. जनरोष आणि शेतकर्‍यांच्या मनातील राग पाहता दिलीपदादांनी ती भावना कॅच केली आणि त्यात ते यशस्वी झाले. खंडीभर मातब्बर भाजप नेत्यांना मुठभरच पण कल्पक आणि निष्ठावंत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते भारी ठरले. असा संदेश या आंदोलनातून जिल्हाभर गेला. सत्तेत पक्ष आल्यानंतर कार्यकर्ते कसे फेसबुक आणि व्हॉट्‌सअप वरच सक्रीय असतात. रस्त्यावर उतरायला निष्क्रीय होतात. हे मरगळ आलेल्या भाजप कार्यकर्त्यांंवरून दिसले. नांदेडात एक निवेदन आणि भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश पाटील हिलाल यांनी लोहा ठाण्यात दिलेली तक्रार वगळता कुठेही  कोणीही निष्ठने आक्रमकपणा  दाखवणारा कार्यकर्ता समोर आला नाही. खंडीभर भाजप नेत्यांना दिलीप धोंडगेंचा मन्याडी हिसका पुरता घायाळ करणारा ठरला.

    Tags