logo

नांदेड, माहूर येथील सहायक सरकारी वकील एक प्रकरणात अपील दाखल करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे.हि कार्यवाही नांदेड शहरात दिनांक 1 जुलै 2017 रोजी रात्री झाली.

माहूर न्यायालयात फौजदारी खटला क्रमांक 113/2014 मध्ये माहूर न्यायालयात दिनांक 6 जून 2017 रोजी त्या प्रकरणातील तीन आरोपी मुरलीधर दूधराम राठोड,श्रीकांत मुरलीधर राठोड आणि विक्रम मुरलीधर राठोड सर्व रा.मुंगशी ता.माहूर यांची एका महिलेला घरात घुसून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपातून मुक्तता झाली होती.या बाबत त्या प्रकरणातील फिर्यादीला जिल्हा न्यायालयात अपील दाखल करायचे होते.त्यासाठी त्यांनी माहूर येथील सहायक सरकारी वकील ऍड.तुकाराम नामदेव पाटील (42) रा.नालंदा नगर नांदेड यांच्याशी संपर्क साधला असतांना अपील करण्यासाठी पाटील यांनी 20 हजारांची लाच मागितली.तेव्हा फिर्यादीने त्याबाबत 29 जून 2017 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीची पडताळणी केली तेव्हा 20 हजारांची लाच मागल्याचे सिद्ध झाले. या लाचमागणीत झालेल्या तडजोडीनंतर 15 हजार लाच स्वीकारण्याचे पाटील याना मान्य केले. 1 जुलै 2017 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास नांदेड शहरातील चैतन्यनगर भागातील माताजी मिक्स आयस्क्रीम आणि ज्यूस सेंटर या दुकानाच्या परिसरात 15 हजारांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक सरकारी वकील ऍड.तुकाराम नामदेव पाटील (42) रा.नालंदा नगर नांदेड यास जेरबंद केले.

हि सापळा कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाठकर,उप अधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बळवंत पेडगावकर, के.पी. शेळके, पोलीस कर्मचारी सुधीर खोडवे, एकनाथ गंगातीर, बाबू गाजुलवार, जगन्नाथ अनंतवार, जयराम विलतगावे, दीपक पवार, अंकुश गाडेकर, नरेंद्र बोडखे, अनिल कदम यांनी पार पाडली. सहायक सरकारी वकील ऍड.तुकाराम नामदेव पाटील (42) रा.नालंदा नगर नांदेड याचे विरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7,13(1)(ड) सह 13(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक बळवंत पेडगावकर हे करीत आहेत. या बातमीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर रेकॉर्डींग असल्यास तसेच कोणीही लोकसेवक भ्रष्टाचार करीत असल्याचा एसएमएस, व्हीडीओ, ऑडिओ कोणाकडे असल्यास त्यांनी ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी. शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी भ्रष्टाचार केला असेल तर आणि शासकीय निधीचा गैरवापर केला असेल तर सुध्दा माहिती द्यावी. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064,कार्यायालचा फोन क्रमांक 02462-253512 आणि पोलिस उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांचा मोबाईल क्रमांक 8554852999 यावर सुध्दा माहिती देता येतील.  

    Tags