logo

नांदेड, खुल्या ट्रेलरचा क्रमांक देवून मुंबई, नांदेडसह अन्य ठिकाणी 84 वेळा प्रवास केल्याचे दाखवून एक लाख 74 हजार 730 रुपयांचा शासकीय अपहार केल्याप्रकरणी धर्माबाद नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष व तत्कालीन नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी निलेश सुनकेवार व चालक राम गौराजी रोनटे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश धर्माबाद येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्माबाद नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकतर्फी सत्ता असताना fफेब्रुवारी ते ऑगस्ट २०१५ या दरम्यान तसेच 10 सप्टेंबर 2015 ते 19 सप्टेंबर 2015 या कालावधीत तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष विनायकराव वसंतराव कुलकर्णी यांनी नगर परिषदेच्या कामासाठी मुंबई व नांदेड येथे प्रवास केल्याचे दाखवून नगर परिषदेकडून चालक राम गौराजी रोनटे यांच्या नावावर धनादेशाव्दारे एक लाख 74 हजार 730 रुपयांची रक्कम उचलली होती. कारव्दारे प्रवास केल्याचे सांगत कुलकर्णी यांनी एमएच-26-बी-3103 या वाहनाव्दारे प्रवास केल्याचे सांगून न.प.कडे प्रवास भत्याची लेखी मागणी केली. या प्रकाराची शहानिशा न करता तत्कालीन मुख्याधिकारी निलेश सुनकेवार यांनी ही रक्कम धनादेशाव्दारे रोनटे यांना अदा केली. धर्माबाद येथील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पोतगंटीवार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहितीच्या अधिकारात तत्कालीन नगराध्यक्ष कुलकर्णी यांच्या प्रवास भत्याची माहिती मिळविली. त्यानंतर नांदेडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एमएच-26-बी-3103 हे वाहन बिना इंजिन व खुल्या ट्रेलर प्रकारात मोडत असल्याचे कळविले. दरम्यान खुल्या ट्रेलर व बिना इंजिनच्या वाहनाव्दारे प्रवास करणे शक्य नसल्याने या प्रकारात शासकीय निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी विनायकराव कुलकर्णी, मुख्याधिकारी सुनकेवार व चालक रोनटे यांनी अपहार केल्याचे उघड झाले. रविंद्र पोतगंटीवार यांनी धर्माबाद पोलीस स्टेशनला सर्व पुराव्यानिशी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्यामुळे पोतगंटीवार यांनी नांदेड येथील प्रसिध्द अ‍ॅड. मिलिंद एकताटे यांच्यामार्फत धर्माबादच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला. या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता 156 (3) अन्वये तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, चालक राम रोनटे व मुख्याधिकारी निलेश सुनकेवार यांच्याविरुध्द चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. या आदेशाने धर्माबादच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    Tags