BREAKING NEWS

logo

नांदेड (एनएनएल) नांदेड शहरात मागील वर्षी दोन खून करुन दहशत निर्माण करणाऱ्या रिंधाचे साथीदार या आरोपाखाली सहा जणांवर मकोका कायद्यान्वये दाखल केलेल्या गुन्ह्यातील सहा जणांची पोलीस कोठडी नाकारताना औरंगाबादचे विशेष न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी बऱ्याच बाबींची दखल घेतली. स्थानिक गुन्हा शाखेचे एक पथक रिंधा व इतर साथीदारांना शोधण्यासाठी 3 जुलैला पंजाबला गेले होते. ते पथक रिकाम्या हाताने 17 जुलै 2017 रोजी परत आले आहे. यामुळे मकोका कायद्याचा वापर करुन केलेल्या गुन्ह्याची सध्या तरी हवाच निघून गेली आहे. 

ऑगस्ट 2016 मध्ये नांदेड येथे बचित्तरसिंघ माळी आणि अवतारसिंघ गाडीवाले उर्फ मन्नू या दोघाांचा खून करुन हरविंदरसिंघ उर्फ रिंधा आणि त्याच्या साथीदारांनी दहशत माजवली होती. फेब्रुवारी 2016 मध्ये रिंधाचा भाऊ सतेंद्रसिंघ याचा खून झाला होता. त्याच्या बदल्यातूनच ऑगस्टमधले खून घडले, असे सांगण्यात येते. या प्रकरणी दोन्ही खुन प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे होता. पुढे पोलिसांनी रिंधाचा वडील आणि एक भाऊ या दोघांना अटक करुन त्यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सतेंद्रसिंघच्या खुन प्रकरणात सुध्दा इतवारा पोलिसांनी तीन जणांना पकडले व काही फरार अशा सदराखाली त्या खुनाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. 24 जुलै 2017 रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात तीन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. त्या तीनही प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हा पोलिसांनी 24 जून रोजी जगजितसिंघ उर्फ जग्गी, दिलबागसिंघ संधू (23), मनप्रितसिंघ उर्फ सोनू सुरजनसिंघ औलक (29), ईश्र्वरसिंघ उर्फ लाली मुक्तारसिंघ रंधावा (21), रणजितसिंघ उर्फ सोनी सुच्चासिंघ चिमा (38), रणजितसिंघ उर्फ राजबिरसिंघ उर्फ रज्जू करमजितसिंघ तबेलेवाले (33) या पाच जणांना पकडले. पुढे करमजितसिंघ उर्फ ऋषी मनजितसिंघ भाटीया (27) यालाही अटक झाली. पुढे या प्रकरणी 29 जून रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड यांच्या आदेशाने या प्रकरणी मकोका (संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999) च्या कलम 3 (1) (2) ची वाढ झाली. त्यामुळे हे प्रकरण औरंगाबादच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग झाले. 

विशेष न्यायालयाने या सर्व सहा जणांना 10 जुलै 2017 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. 10 जुलै रोजी या प्रकरणात पुन्हा 13 दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती करताना त्यासोबतच पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांनी नांदेडमधील सॉबीसिंघ नावाच्या माणसाच्या घराची तपासणी करण्यासाठी वॉरंटची मागणी केली होती. या प्रकरणी उत्तर देताना आरोपींच्या वतीने ऍड. ऋषिकेश गंगाखेडकर, आर.एस.कुलकर्णी आणि ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी सांगितले की, या प्रकरणात कोणताही प्रभावजन्य पुरावा पोलीस आणू शकलेले नाहीत, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची गरज नाही. सोबतच न्यायालयाने सॉबीसिंघ याच्या घराची तपासणी करण्यासाठी मागितलेली परवानगी आपल्या आदेशात उल्लेखीत करताना न्यायाधिश गोसावी यांनी पोलिसांना तपास करताना कोणाचेही घर तपासता येते पण सॉबीसिंघ घराची तपासणी पोलिसांना करु देत नाही या त्यांच्या सांगण्यातील दम दिसला असा उल्लेख केला. पोलीस कोठडी दरम्यानच्या काळात आरोपींकडून काहीच अभद्र वस्तू जप्त करण्यात आली नाही, या बाबीचा उल्लेख न्यायालयाने करुन सहा जणांना मागितलेली वाढीव पोलीस कोठडी नामंजूर केली. या प्रकरणातील फरार असलेले आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंधा संधू, आकाशसिंघ गाडीवाले, सोनी ढिल्लो या तिघांना शोधण्यासाठी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे एक पोलीस पथक 3 जुलै 2017 रोजी पंजाब राज्यात गेले होते. तब्बल 14 दिवसानंतर दि.17 जुलै रोजी हे पथक सुखरुप परत नांदेडला आहे. पण रिकाम्या हातानेच. यावरुन नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने केलेली मकोका कायद्याची ही कारवाई सध्या तरी हवा संपल्यागत वाटत आहे.

    Tags