logo

BREAKING NEWS

नवरा सोडून इतरासोबत प्रेम संबंध महागात पडले

प्रियकर आणि प्रेयसी दोघांना पाच वर्ष कैद आणि दंड

नांदेड, आपल्या नवऱ्याला सोडून इतर व्यक्तीसोबत जुळविलेले प्रेमसंबंध आणि त्यानंतर नवऱ्याने केलेली आत्महत्या या प्रकरणात ती विवाहित प्रेयसी आणि तिच्या प्रियकराला नांदेडचे सहायक सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी 5 वर्ष साधी कैद आणि दोघांना दोन-दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

10 मे 2016 रोजी नांदेडच्या सिडको एमआयडीसी मागे एनडी-41-ए-2/3 या घरात बळीराम धनाजी कंधारे (35) यांनी छताच्या हुकाला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी प्रिती बळीराम कंधारे (29) यांनी याबाबत दिलेल्या खबरीनुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यू दाखल केला. त्या दिवसानंतर दि.14 मे 2016 रोजी मयत बळीराम कंधारेचे बंधू लक्ष्मण धनाजी कंधारे रा.गुलाबवाडी ता.कंधार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रिती आणि बळीरामचे लग्न होवून एक मुलगा आणि एक मुलगी झाली. लग्नानंतर प्रितीने वसरणी येथील विजयानंद उर्फ विजय रामराव पोवळे (34) सोबत सूत जमविले. अगोदर प्रिती आणि बळीराम कंधारला राहायचे. तेथे सुध्दा विजय पोवळे येत असे. ही बाब उघड झाल्यानंतर सर्वांसमक्ष आम्ही पुन्हा असे करणार नाही असे दोघांनी सांगितले. कंधार येथे झालेल्या बदनामीने बळीराम आपली पत्नी प्रिती यांना घेवून बळीरामपूर येथे राहण्यास आला. त्यावेळी बळीरामचे सासरे अशोक किशन मुक्कावार आणि सासू शोभाबाई अशोक मुक्कावार हे सुध्दा बळीरामपूरमध्येच राहत होते. 10 मे 2016 रोजी या दोघांनी मिळून बळीरामला मारहाण केली आणि या झालेल्या बेईज्जतीने बळीरामने आत्महत्या केली आहे. या तक्रारीवरुन प्रिती, विजय पोवळे, प्रितीचा वडील अशोक मुक्कावार आणि आई शोभा मुक्कावार यांच्याविरुध्द भादंविच्या कलम 306, 497 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.पी.करपे आणि पोलीस उप निरीक्षक मनोज पांडे यांनी करुन दोघांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याआधारे न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी बळीराम कंधारेच्या आत्महत्येला त्याची पत्नी प्रिती कंधारे आणि तिचा प्रियकर विजय रामराव पोवळे हे दोषी असल्याचे मानले. प्रितीचे आई, वडिल या प्रकरणातून मुक्त करण्यात आले. सिध्द झालेल्या प्रकरणासाठी न्यायाधीश मांडे यांनी प्रिती कंधारे आणि तिचा प्रियकर विजय रामराव पोवळे या दोघांना पाच वर्ष साधी कैद आणि प्रत्येकास दोन हजार रुपये रोख दंड ठोठावला. या खटल्यात  सरकार पक्षाच्या वतीने ऍड. मनीकुमारी बत्तुल्ला यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी घुगे आणि फय्याज सिद्दीकी यांनी काम केले.

    Tags