logo

BREAKING NEWS

तृतीयपंथीयांच्या घटनात्मक अधिकारांना मदत करण्यासाठी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदा तत्पर - न्या. मांडे

नांदेड, भारतातील तृतीयपंथीयांच्या घटनात्मक अधिकारांना मदत करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नेहमीच तत्पर असल्याचे प्रतिपादन सहायक जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी केले. काल दि.18 मे रोजी रेल्वे स्थानक परिसरात कायदेविषयक बाबींचा मेळावा विशेष करुन तृतीयपंथियांसाठी करण्यात आला होता. या मेळाव्यात इतर उपस्थितांमध्ये प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जे.एन.जाधव, रेल्वेचे पोलीस निरीक्षक धनंजय यादव आणि जीआरपीचे पोलीस निरीक्षक आत्तार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमात अनेक तृतीयपंथीय जमले होते. 

याप्रसंगी पुढे बोलताना न्यायाधीश मांडे म्हणाले, व्यक्ती या शब्दामध्ये आता स्त्री,पुरुष आणि तृतीयपंथीय या सर्वांचा समावेश आहे. 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आलेल्या एका प्रकरणात तृतीयपंथियांना  घटनात्मक अधिकार मिळाले आहेत. तृतीयपंथीयांनी आपल्यावर समाज आक्षेप घेईल असे काम करण्यापेक्षा टेलरींग, संगणक अशा कामांमध्ये निपुणता प्राप्त करावी. जेणेकरुन त्यांना योग्य न्याय मिळेल. सोबतच त्यांच्या घराच्या योजना, त्यांच्या शिक्षणाची सोय आणि यासोबत इतर शासकीय योजनांमध्ये त्यांना जेंव्हा गरज वाटेल तेंव्हा त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करावा आणि त्या योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर राहील. याप्रसंगी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे.एन.जाधव म्हणाले, तृतीयपंथीयांना उत्पन्नाचे साधन नाही, त्यांना घर हवे आहे, त्यांना आधारकार्ड हवे आहे, त्यांना मतदान कार्ड मिळाले नाही, ते बनवून घेण्यात काही अडचणी असतील तर त्यांनी विधी सेवा प्राधिकरणासोबत मदत घेवून आपल्या गरजा पूर्ण कराव्यात. तृतीयपंथी आता मोठे झाले आहेत. उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये तृतीयपंथी महापौर आहे. काही आमदार झाले, काही नगरसेवक सुध्दा झाले आहेत. त्यामुळे कोणीच स्वतःला कमी समजण्याची गरज नाही. आणि विधी सेवा प्राधिकारणाने त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी योजना तयार केल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा. 

 रेल्वेचे पोलीस निरीक्षक धनंजय यादव यांनी सांगितले की, यापूर्वी सुध्दा तृतीयपंथी लोकांच्या अधिकाराबाबत अनेक बैठक झाल्या, पण त्या बैठकांमधून पुढे काहीच घडले नाही.  त्यामुळे फक्त बैठका घेण्याऐवजी त्यांच्यासाठी ठोस प्रभावाच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. जीआरपीचे पोलीस निरीक्षक आत्तार यावेळी सांगत होते की तृतीयपंथीयांनी रेल्वेमध्ये प्रवाशांना त्रास देवू नये, आपल्या उत्पन्नासाठी जी काही पध्दत ती रेल्वेमध्ये अवलंबतात ती प्रेमाने व्हावी, असे कोणतेही कृत्य करु नये जेणेकरुन तृतीयपंथीयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रसंग येईल. तृतीयपंथीयांचा गुरु वर्षा बकस याने सांगितले की, समाजातील माणसे आम्हाला आपल्या घरातील रुम किरायाने देणे पसंत करत  नाहीत याची खंत वाटते. दादा,भाऊ अशा शब्दात आम्ही लोकांशी बोलतो, पण प्रतिसादात समाजाकडून वाईट प्रतिसाद मिळतो. आमच्या गुरुंनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच आम्ही चालतो, याप्रसंगी प्रशासनाला वर्षाने विनंती केली की, एखाद्या तृतीयपंथीयांनी केलेल्या चुकीसाठी त्यालाच जबाबदार धरा, सर्वांना दोषी मानू नका. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड.नईम पठाण यांनी केले आणि आभार विधी सेवा प्राधिकरणचे खरात यांनी मानले.

    Tags