logo

BREAKING NEWS

नांदेड क्लब मध्ये मनोरंजनाच्या नावाखाली चालतो जुगार अड्डा

एका पत्राने केला खुलासा

नांदेड, नांदेड क्लबमध्ये पत्यांवर पैसे लावून रात्रभर जुगार चालू असतो असे एक पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रावर अशोक चंद्रकांत नागठाणे यांचे नाव लिहिलेले आहे. पण स्वाक्षरी मात्र नाही. हे पत्र पोस्टाने आले आहे.

आज दि.19 मे रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान प्राप्त झालेल्या एका पोस्ट लिफाफयात दोन पानी पत्र आहे ते पत्र जिल्हाधिकारी नांदेड यांना संबोधून लिहिले आहे. त्यात असे  नमुद आहे की, सार्वजनिक विश्र्वस्त अशी नोंदणी असलेल्या नांदेड क्लबमध्ये अनाधिकृत कार्ड रुम आहे. ते कार्ड रुम सदस्य, पाहुणे आणि जे सदस्य नाहीत त्यांच्यासाठी आहे. या कार्ड रुममध्ये पैसे लावून पत्ते खेळले जातात. दररोज लाखोंची उलाढाल होत असते. नांदेड क्लब सुध्दा त्यासाठी फिस आकारते. ती सुध्दा हजारोंमध्ये आहे. आणि त्याला करमणूक कक्ष असे नाव देण्यात आले आहे. या पत्रात असेही नमुद आहे की, असे कार्डरुम चालविण्याची कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र  पोलीस विभागाने लिहिलेले नाही. त्यांना कोणत्याही सक्षम प्राधिकरणाने पत्यावर जुगार चालविण्याची परवानगी सुध्दा दिलेली नाही. आणि त्या जुगाराच्या रुममधून फिस घेण्याची परवानगी सुध्दा नाही. ही पत्यांची जुगार रुम रात्रभर सुरु असते.  त्यामुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो.

या पत्रात असेही लिहिले आहे की, नांदेड क्लबमध्ये रेस्टॉरंट आणि बार पण आहे. नांदेड क्लबजवळच नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज आणि पीपल्स कॉलेज आहे. मुलांचे वसतिगृह आहे, सार्वजनिक  बांधकाम विभागाचे मंडळ कार्यालय आहे आणि हे सर्व ज्याठिकाणी आहे त्याच ठिकाणी बार आणि रेस्टॉरंट असणे बेकायदा आहे. या पत्राच्या प्रती विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड, पोलीस महासंचालक मुंबई, मुख्य सचिव गृहविभाग आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविल्याचे सुध्दा टंकलिखित केलेले आहे. या पत्रावर कोणाची स्वाक्षरी नाही पण हे पत्र पोस्टाव्दारे पाच रुपयाचे शुल्क लावून पत्रकारांना पाठविण्यात आले आहे.

    Tags