मुंबईत प्रदर्शन केंद्र व विद्यापीठ उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्वेलरी व हिरे व्यवसायाच्या वृद्धीसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य
43 व्या इंडिया जेम अँड ज्वेलरी अवॉर्डसचे वितरण
मुंबई(प्रतिनिधी)ज्वेलरी आणि हिरे हा देशाला मोठे परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होते. मुंबई हे या व्यवसायासाठी महत्त्वाचे शहर असून या व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. या क्षेत्राच्या वृद्धीसाठी मुंबईत प्रदर्शन केंद्र व विद्यापीठ उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

रत्न तथा आभूषण निर्यात संवर्धन परिषदेतर्फे 43 व्या इंडिया जेम अँड ज्वेलरी अवॉर्डसचे वितरण येथील हॉटेल ट्रायडंट येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रवीण शंकर पंड्या, उपाध्यक्ष रसेल महेता, किरीट भन्साळी यांच्यासह अनेक मान्यवर व्यावसायिक उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले की, ज्वेलरी व हिरे व्यवसायाच्या वृद्धीसाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य मिळेल. या व्यवसायातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासही प्राधान्य देण्यात येईल. जीएसटीबाबत काही अडचणी असल्यास त्यातून निश्चित मार्ग काढला जाईल. रत्न तथा आभूषण निर्यात संवर्धन परिषदेने या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान केल्यामुळे या क्षेत्रातील नवीन व्यावसायिकांना प्रेरणा मिळेल. व्यावसायिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही बाळगली पाहिजे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. त्यांच्या भाषणाने आज उपस्थितांना जिंकून घेतले. भाषणावेळी उपस्थितांनी उभे राहून मुख्यमंत्र्यांना उत्स्फूर्तपणे दाद दिली.

यावेळी ज्येष्ठ व्यावसायिक शेवंतीलाल शाह यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला उद्योजक सुनिता शेखावत यांनाही यावेळी गौरविण्यात आले. पी.सी.ज्वेलर्स, एमराल्ड ज्वेल इंडस्ट्री, श्री मोमाई कृपा ज्वेलर्स, रेनेसान्स ज्वेलरी, एच.के.डिजाइन्स, एस.जोगणी एक्सपोर्ट, रॉयल इम्पेक्स, वैभव ग्लोबल, एसीपीएल एक्सपोर्ट, इंडस्ट्रियल ज्वेल्स, आम्रपाली एक्स्पोर्ट, आरएमसी जेम्स इंडिया, केजीके सेझ युनिट, सिल्वर अँड आर्ट पॅलेस, किरण जेम्स, पारिशी डायमंड, किरण ज्वेलरी, लक्ष्मी डायमंड, बोधी ब्रँडस, स्टार रेझ, कपू जेम्स, हरीकृष्ण एक्सपोर्ट, बँक ऑफ नोव्हा स्कॉटिया, एमएमटीसी, समर्थ डायमंड, बीव्हीसी ग्रुप, एस विनोद कुमार युएसए, किरण एक्सपोर्ट (एच के), बाफलेह ज्वेलरी, किरण एक्स्पोर्ट बीव्हीबीए, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, विजया बँक आदी उत्कृष्ट कामगिरी करणा-या संस्थांना यावेळी गौरवण्यात आले.

Related Photos