प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङ्‌मय पुरस्कार जाहीर

डॉ. जनार्दन वाघमारे, ऐश्वर्य पाटेकर, विजय पाडळकर पुरस्कारांचे मानकरी
नांदेड(प्रतिनिधी)प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या वाङ्‌मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, ऐश्वर्य पाटेकर आणि विजय पाडळकर यांचा या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी देण्यात येणाऱ्या प्रसाद बन वाङ्‌मय पुरस्कारासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रा. ऐश्वर्य पाटेकर यांच्या 'जू ' ह्या आत्मचरित्राची निवड करण्यात आली आहे. रु.11,111 रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्यक्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला मातोश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाच्या साधना सन्मानासाठी ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. रु. 11,111 रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार 'देवदास ते भुवनशोम' ह्या चित्रपट समीक्षाग्रंथासाठी विजय पाडळकर यांना देण्यात येणार आहे.

प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि वाङ्‌मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी नांदेड येथे या पुरस्कारांची घोषणा केली. प्रतिष्ठानच्या वाङ्‌मय पुरस्कारांचे हे 16 वे वर्ष आहे. रविवार, दि. 16 एप्रिल रोजी भु. द. वाडीकर यांच्या अध्यक्षतेखाली अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

Related Photos