प्राचार्य ग.पि. मनूरकरांच्या माहेरवाटा कथासंग्रहाचे थाटात प्रकाशन

नांदेड(प्रतिनिधी)आजच्या गतिमान युगात गगनाला गवसणी घालणारे अनेक शोध लागले, लोक चंद्रावर जाऊन आले, उद्या मंगळावरही जातील परंतु पृथ्वीतलावरील स्त्री मात्र अजूनही बंदीवानच आहे, सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहे. अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा पद्धती, चूलमूल संस्कृती व संकुचित दृष्टिकोनामुळे आजही विवाहित स्त्रियांना माहेरची वाट धरावी लागते. तरीही आपला पदर कमरेला घट्ट खोचून आणि पाय जमिनीत पक्के रोवून ही स्त्री खंबीरपणे उभी राहण्याचा प्रयत्न करते. धडपडते शेवटी तिची ही केविलवाणी धडपड तिला माहेरवाटेवर आणून सोडते. अशा नऊ माहेरवाशिणींची व्यथा प्राचार्य ग.पि. मनूरकरांनी माहेरवाटा या कथासंग्रहात मांडली आहे, असा विचार मान्यवर साहित्यिकांनी प्रकाशन सोहळ्यात मांडला.

गोदावरीच्या काठावर वसलेल्या मनूर या गावातील गुरू गोविंद सिंघजी आश्रमशाळेत हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. प्रसिद्ध लेखिका डॉ. ललिता शिंदे-बोकारे यांचे हस्ते माहेरवाटाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी उमरी साहित्य परिषदेचे सचिव सौ. नंदा देशमुख या होत्या. यावेळी नांदेड साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रभाकर कानडखेडकर आणि कलासक्त अध्यापक पंडित पाटील बेळीकर यांनी माहेरवाटावर आपले विचार प्रकट केले.

प्रारंभी संयोजक डॉ. भगवान मनूरकरांनी प्रास्ताविक केले. लेखक ग.पि. मनूरकरांच्या मनोगतानंतर नंदादीप प्रकाशनाच्या वतीने बाजीराव पठाडे यांनी आपली भूमिका मांडली. या कार्यक्रमास साहित्यिक देवीदास फुलारी, देवदत्त साने, बाजीराव मनूरकर, किशन मनूरकर, महेश मोरे आणि दिगंबर कदम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ. मीना घोडके यांनी केले तर आभार कवी शिवाजी जोगदंड यांनी मानले. यावेळी उमरी परिसरातील अध्यापक, साहित्यिक, रसिक व मनूरचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Photos