राज्यात आणखी तीन ठिकाणी तंत्रज्ञान सहायित गुन्हे अन्वेषण केंद्र स्थापन करण्यास मान्यता

मुंबई(प्रतिनिधी)गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई व महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे तंत्रज्ञान सहायित गुन्हे अन्वेषण केंद्र स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय गृह विभागाने नुकताच प्रसिध्द केला आहे.

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण व त्याचे जनमानसांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता त्यावर प्रभावी नियंत्रण करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हा पोलीस मुख्यालये व आयुक्तालयात तंत्रज्ञान सहायित गुन्हे अन्वेषण केंद्र यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहेत. याच धर्तीवर राज्यात गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई व महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे या तीन ठिकाणी अशीच तंत्रज्ञान सहायित गुन्हे अन्वेषण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाला नुकतीच गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यास मदत होणार आहे.

Related Photos