Breaking news

भाजपची पारदर्शकता व शिवसेनेचा स्वाभिमान म्हणजे निव्वळ ढोंग!: विखे पाटील

नाशिक महानगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे विमोचन
नाशिक(प्रतिनिधी)भारतीय जनता पक्षाची पारदर्शकता आणि शिवसेनेचा स्वाभिमान म्हणजे निव्वळ ढोंग असून, त्यांच्या सरकारचा कारभार नेमका उलट्या पद्धतीने सुरू असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

नाशिक मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे विमोचन करताना ते बोलत होते. नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, अश्र्वीनीताई बोरस्ते आदी नेते उपस्थित होते.

याप्रसंगी त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. भाजपच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्याची पोलखोल करताना ते म्हणाले की, पवन पवार सारख्या गुंडाला पक्षात प्रवेश देऊन पावन करण्यात आले. नाशिक शहरात उमेदवारीसाठी भाजप नेत्यांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांचे स्टींग जनतेने बघितले. हुतात्मा चौकात व सिंहगडावर पारदर्शकतेच्या शपथा घ्यायच्या आणि प्रत्यक्ष आचरणात नैतिकता गुंडाळून ठेवायची, असा भाजपचा दुतोंडी कारभार आहे. भारतीय जनता पक्ष इव्हेंट आणि स्टंट करण्यात पटाईत आहे. परंतु, महाराष्ट्राने त्यांचा खरा चेहरा ओळखला असून, येत्या निवडणुकीत मतदार भाजपची पारदर्शक पद्धतीनेच सफाई करतील, असा दावा विखे पाटील यांनी केला.

शिवसेनेच्या स्वाभिमानाचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, शिवसेनेच्या सरकारमधून बाहेर पडण्याच्या गोष्टी म्हणजे बनवाबनवी असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेचा अजून कोणताही निर्णय झालेला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. तरीही शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरत असल्याचे सांगतात. मागील दोन वर्ष शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबत चकार शब्द काढला नाही. आता निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने कोणताही निर्णय होऊ शकत नाही, याची जाणीव असूनही शिवसेनेचे मंत्री मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात, ही जनतेची फसवणूक असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

आपल्याकडे मोदींची कुंडली असल्याबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरही विखे पाटील यांनी शिवसेनेला कोंडीत पकडले. शिवसेनेकडे मोदींची कुंडली होती तर केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेचा संसार मांडण्यापूर्वी ती कुंडली तपासली का नव्हती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नाशिक महानगर पालिकेमधील १९९२ ते २००२ दरम्यानचा कार्यकाळ आणि त्यानंतरच्या १५ वर्षांचा कारभार, याची तुलना करून राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Photos