राज्याच्या अर्थ संकल्पाकरिता मराठवाडा विकास मंडळ अभिप्राय देणार -डॉ. पुरुषोत्तम भापकर

औरंगाबाद(प्रतिनिधी)राज्याच्या अर्थसंकल्पातील योजनांतर्गत व योजनेतर खर्चाचे एकत्रिकरण करण्याकरिता मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य आपला अभिप्राय राज्य शासनाला सादर करणार आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त तथा मंडळाचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची बैठक आज वैधानिक विकास मंडळाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. भापकर हे होते. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. निधी पांडेय, मंडळाचे तज्ञ सदस्य सर्वश्री डॉ. कृष्णा लव्हेकर, भैरवनाथ ठोंबरे, मुकूंद कुलकर्णी आणि डॉ. अशोक बेलखोडे तसेच सहसंचालक महेंद्र हरपाळकर, अर्थ व सांख्यीकी संचालनालयाचे सहसंचालक श्री. कि.भ.जोशी, जिल्हा नियोजन समिती, सहसंचालक लेखा व कोषागारे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

वार्षिक अर्थसंकल्पात खर्चाचे महसूली व इतर खर्च असे विभाजन दर्शविणे बंधनकारक आहे. खर्चाचे योजनांतर्गत व योजनेतर अशी विभाजनाची तरतूद नसून ती एक प्रकारची प्रशासकीय व्यवस्था आहे. केंद्र शासनाप्रमाणे राज्यात योजनांतर्गत व योजनेतर खर्चाचे एकत्रिकरण करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. या संदर्भात शासनाने आर्थिक वर्ष 2017-18 पासून योजनांतर्गत व योजनेतर खर्चाचे एकत्रिकरणाचा शासन निर्णय पारित केला असून या निर्णयाला अनुसरुन वैधानिक विकास मंडळाचे सदस्य आपला अभिप्राय येत्या 20 फेब्रुवारी 2017 ला राज्य शासनाला सादर करणार आहे. याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच येत्या एप्रिल 2017 मध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे शेतकरी कार्यशाळा घेण्याचा ठराव संमत करण्यात आला.

Related Photos