Breaking news

छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे(प्रतिनिधी)छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयेतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला आहे त्या विचारांचा अवलंब करुन राज्यकारभार करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शिवनेरी ता. जुन्नर येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते.

शिवजयंतीच्या सोहळ्यास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायकराव मेटे, आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच शिवप्रेमी नागरिक मोठया संख्यने उपस्थित होते. परकियांच्या आक्रमणातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला मुक्त केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिवरायांच्या प्रेरणेने, स्फुर्तीने त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे, त्या विचारांचाच अवलंब करुन राज्यकारभार लोकाभिमुख करण्यावर भर देणार आहोत. शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने रयतेला स्वाभिमान शिकविला. राज्यकारभार कसा चालवतात याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श घालून दिला. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आणि आमदार शरद सोनवणे यांचेही यावेळी भाषण झाले. क्रीडा संघटक व ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद सावंत यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पगडी बांधून व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

समारंभापूर्वी शिवजन्मस्थळाचे ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे उपस्थितीत महिलांनी शिवजन्माचा पारंपरिक पाळणा सादर केला. यानंतर जिल्हा परिषदेच्या ठाकरवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध तरुण मंडळांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर केले. यानंतर शिवकूंज येथील राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली.शिवजयंती निमित्त आज शिवनेरी किल्ला शिवभक्तांच्या अलोट गर्दीने फुलला होता. शिवघोषाने दुमदुमून गेला होता.

Related Photos