सहा महानगरपालिकांच्या मतदार याद्यांवर हरकती व सूचनांसाठी 20 पर्यंत मुदतवाढ - राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई(प्रतिनिधी)भिवंडी- निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर व पनवेल महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 20 मार्च 2017 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, यापूर्वी देण्यात आलेल्या मतदार यादी कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत 18 मार्च 2017 पर्यंत होती; परंतु लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या (ता. 19) सार्वजनिक सुट्टी असली तरीदेखील हरकती व सूचना स्वीकारण्यात येतील. मुदत वाढ दिल्यामुळे आता प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 24 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध होतील; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 25 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

Related Photos