BREAKING NEWS

logo

नांदेड, स्‍वच्‍छ भारत मिशन अंतर्गत राज्‍यभर शौचालय बांधकामाने मोठी गती घेतली आहे. नांदेड जिल्‍हा शौचालय बांधकामात अग्रेसर असून अर्धापूर तालुक्‍या पाठोपाठ आता मुदखेड तालुका हागणदारीमुक्‍त झाला आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

मुदखेड तालुक्‍यात 50 ग्राम पंचायत असून पायाभूत सर्वेक्षणानुसार हा तालुका दिनांक 8 जुन रोजी हागणदारीमुक्‍त घोषित करण्‍यात आला आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्‍या मार्गदर्शनामध्‍ये मुदखेड तालुक्‍यात शौचालय बांधकामासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात आले. यासाठी अधिका-यांच्‍या गावस्‍तरीय गृहभेटी, गावनिहाय संपर्क अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्‍या सहभागातून स्‍वच्‍छतेविषयी तालुक्‍यात मोठी जनजागृती करण्‍यात आली होती. चालू वर्षात मुदखेड तालुक्‍यासाठी बेसलाईन सर्वेक्षणानुसार 14 हजार 970 शौचालय बांधकामाचे उदिष्‍ट ठेवण्‍यात आले होते. आज 8 जुन रोजी हे उदिष्‍ट पूर्ण झाले आहे. जिल्‍हयातील शौचालय बांधकाम केलेल्‍या लाभार्थ्‍यांची नावे केंद्र शासनाच्‍या संकेतस्‍थळावर उपलोड करण्‍यात येतात. आज रोजी हे काम शंभर टक्‍के पर्यंत पूर्ण केले आहे.

राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्‍हाण यांनी तालुका हागणदारीमुक्‍त करण्‍यासाठी विविध कार्यक्रमातून स्‍वच्‍छतेविषयी प्रबोधन केले आहे. आमदार अमिताताई अशोकराव चव्‍हाण, गोविंदराव शिंदे नागेलीकर, पंचायत समितीच्‍या सभापती शिवकांताताई शत्रुघन गंड्रस, उपसभापती आनंदराव गादीलवार, पंचायत समिती सदस्‍य बालाजी सुर्यतळे, सुमित्राताई लक्ष्‍मण कांजाळकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य सविता संतोष वारकड, अरुणा भिमराव कल्‍याणे, तसेच माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य रोहिदास जाधव, प्रभावती बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी पुढाकार घेऊन ही मोहिम यशस्‍वी केली आहे. या मोहिमेमध्‍ये गट विकास अधिकारी प्रतिभा यन्‍नावार, सहाय्यक गट विकास अधिकारी मारोती जाधव, विस्‍तार अधिकारी प्रदिप मुरादे, निलेश बंगाळे, एस.आर.कांबळे, बाळाभाऊ लहानकर, अशोक देशमुख, उजमा बेगम, एम.टी.कदम, कृषि अधिकारी गुरुपवार, क्षमता बांधणी तज्ञ चैतन्‍य तांदुळवाडीकर, गट समन्‍वयक लक्ष्‍मीकांत टाकळकर, समुह समन्‍वयक अरुण वाघमारे, ग्रामसेवक संघटनेचे ई.जी.कदम, ग्रामसेवक संघाचे बी.एल.पपुलवाड, गिरीधारी मोळके, शिवकुमार देशमुख, पानेवार, रेशमलवार, बाचेवाड, या सर्वांनी मिळून शौचालय बांधकामासाठी गावा-गावात गृहभेटीव्‍दारे तालुक्‍यात लोकचळवळ निर्माण केली. तसेच लाभार्थ्‍यांची नावे ऑनलाईन करण्‍यासाठी जिल्‍हा संनियंत्रण मुल्‍याकंन सल्‍लागार प्रविण पाटील यांचाही मोलाचा सहभाग मिळाला. पाणी व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी व्‍ही.आर.कोंडेकर, जिल्‍हा संनियंत्रण प्रमुख डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक मिलिंद व्‍यवहारे, आदींनी वळोवेळी मुदखेड तालुक्‍यात गावांना भेटी देवून ग्रामस्‍थांना स्‍वच्‍छतेबाबत प्रोत्‍साहीत केले.

मुदखेड जिल्‍हयातला दुसरा तालुका 
नांदेड जिल्‍हयात एकूण 16 तालुके असून यापूर्वी अर्धापूर तालुका हागणदारीमुक्‍त झाला आहे. आता मुदखेड तालुका हागणदारीमुक्‍त झाल्‍याने जिल्‍हयात मुदखेडने दुसरा क्रमांक मिळविला आहे. उर्वरीत 14 तालुक्‍यांपैकी हदगाव, भोकर, हिमायतनगर, माहूर व धर्माबाद हे पाच तालुके लवकरच हागणदारीमुक्‍त करण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाने नियोजन केले आहे. हदगाव तालुक्‍यात भंडारा जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशनचे 11 अधिकारी व कर्मचारी एका महिण्‍यासाठी शौचालयाच्‍या प्रबोधनासाठी काम करत आहेत. जिल्‍हयाचे शौचालय बांधकामाचे उद्दिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी विविध उपक्रम हाती घेण्‍यात आले आहेत. यामधून येत्‍या काही दिवसात हदगाव, भोकर, हिमायतनगर, माहूर व धर्माबाद हे पाच तालुके हागणदारीमुक्‍त केली जातील, अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

प्रधान सचिव राजेशकुमार यांनी केले कौतुक 
अर्धापूर पाठोपाठ मुदखेड तालुका हागणदारीमुक्‍त केल्‍याबद्दल राज्‍य शासनाच्या पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड, गट विकास अधिकारी प्रतिभा यन्‍नावार यांचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे. अर्धापूर व मुदखेड तालुक्‍यांचा आदर्श घेऊन इतर तालुक्‍यांनी शौचालय बांधकामाची गति वाढवून जिल्‍हा हागणदारीमुक्‍त करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे.

    Tags