BREAKING NEWS

logo

नांदेड, मुदखेड तालुक्यातील बारड येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने इंग्रजी माध्यमातील शाळेतून 95 टक्के गुण मिळवून मिरीटच्या यादीत आली असल्याने माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण तसेच आ. अमिताताई चव्हाण यांनी कु. धनश्री मोहनराव देशमुख हिचे विशेष गुणवत्तेबद्दल कौतुक केले आहे.

शेती व्यवसायातून मोहनराव दादाराव देशमुख यांनी मुलीस इंग्रजी माध्यमातील शाळेतून शिक्षण देण्याचा दृढ निश्चय केला होता. दरवर्षी शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागविला होता. धनश्री देशमुख हिस सुरूवातीपासून ऑक्सफर्ड या इंग्रजी शाळेत प्रवेश दिला होता. शेतकरी वडिलांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर धनश्री देशमुखने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. दहावीच्या शालांत परीक्षेत इंग्रजी माध्यमातून मिरीटमध्ये येण्याचा बहुमान तिने मिळविला आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी मतदारसंघातील शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलीने मिळविलेले घवघवीत यश कौतुकास्पद असून जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविल्याची प्रतिक्रिया दिली. धनश्री देशमुख हिचे विविध स्तरावररून कौतुक केले जात असल्याने शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. इंग्रजी, विज्ञान, संस्कृत या विषयात 100 पैकी 99 गुण घेऊन विशेष यश संपादन केले असून याचे सर्व श्रेय शिक्षिका सुरेखा कुलकर्णी यांना दिले आहे. कुठलीही खाजगी शिकवणी न लावता हे यश संपादन केले आहे. भविष्यात शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असून डॉक्टर बनण्याची इच्छा धनश्रीने व्यक्त केली आहे. या यशाबद्दल कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रा. कैलास दाड, जि.प. सदस्य सौ. सविता वारकर, माजी जि.प. सदस्य रोहिदास जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी के.डी. देशमुख, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष प्रताप देशमुख, माजी उपसरपंच गोपाळराव देशमुख, नामदेव बिच्चेवार, नरसिंग आठवले आदींनी कौतुक केले आहे.
 

    Tags