logo

नांदेड, मतदानापासून एक ही पात्र मतदार वंचित राहू नये असे आयोगाचे धोरण आहे. त्यासाठी तरुण पात्र मतदार, महिला मतदार तसेच वंचित मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले.  
जिल्हा व तालुका प्रशासन निवडणूक विभागाच्यावतीने तरुण व पात्र मतदार नोंदणी अभियान महाविद्यालयामार्फत राबविले जात आहे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार भावी मतदारांसाठी आंतरशालेय परिसंवादाचे माध्यमातून मतदार जागृती करण्यासाठी महिन्यातील हा दुसरा कार्यक्रम शासकीय तंत्रनिकेतन येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती ढालकरी यांनी मतदानाचे महत्व सांगितले.  महाविद्यालय व भावी, तरुण मतदारांनी या चळवळीचा भाग व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले. प्राचार्य श्री. पोपळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवून लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन केले. यावेळी मस्ती दोस्ती मतदान या फिल्म नंतर मतदान यंत्राची सुरक्षितता व विश्वासर्हता याबाबतची क्लीप दाखविण्यात आली. संगणक खेळ स्पर्धाही आयोजित केल्या गेली. निवडणूक नायब तहसिलदार गजानन नांदगावकर, निवडणूक विभागाचे श्री. हंबर्डे व महाविद्यालयाचे नोडल अधिकारी श्री. कळसकर यांचेसह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी केले तर प्राचार्य श्री. पोपळे यांनी आभार मानले. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    Tags