logo

नांदेड, एका तरुणीसह चार जणांचे दि. ७ मे अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आली. तसेच तरुणीचा विनयभंग करण्यात झाला असताना पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. असा आरोप करत भारतीय कामगार सेनेने २० मे पासून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केला आहे.  

भारतीय कामगार सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले की, दि. ७ मे रोजी शहरातील ज्योती बिग सिनेमा थेयटरमध्ये चित्रपट पाहून सैलाबन नगर नांदेडमधील दोन तरुणी व भोसी येथील मनोज सरपाते, नामदेव गायकवाड असे चौघे जण ऑटोने घरी जात होते. यावेळी शंभर दीडशे जणांनी हा ऑटो अडवून अर्वाच्य व अश्लील भाषेत शिविगाळ करीत ऑटोचालकास मारहाण केली. आणि ऑटोचालकाला धमकावून सदर ऑटो लालवाडी भागाकडे नेला. त्याठिकाणाहून मारुती ओमनी व्हॅन क्रमांक एमएच-२०  एजे ५५३६ या वाहनातून चौघांनाही कोंबले. आणि तुमचे घर कुठे आहे, तुमचा संबंध काय..? अशी विचारणा करीत नसरतपूरच्या रानशिवारात नेले. येथे त्या डान्यतांनी हॉकी, रॉड, केबल वायर व फावड्याच्या दांड्याने मनोज व नामदेव यांना जबर मारहाण केली. त्याच ठिकाणी त्यांना सोडून व्हॅन लालवाडीकडे आणून पीडित मुलीच्या मामांना कॉल करुन तेहरानगरमध्ये बोलावण्यात आले. तिचा मामा तेथे आला त्यावेळी व्हॅनमध्ये भाची बेशुध्दावस्थेत, छेडछाड केल्याच्या स्थितीत जखमी असल्याचे दिसले. या तरुणीचा मोबाईल, पैसे, दागिने लंपास केल्याचे आढळून आले. नसरतपूरच्या शेतात जखमी पडलेल्या तरुणांना प्रदीप सरोदे व गावातील नागरिकांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सर्व मारेकरी मोकाट फिरत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करुन संबंधितांना अटक करावी अन्यथा २० मे पासून आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कामगार सेनेने दिला आहे. या निवेदनावर सुरेश लोट, रामा रोकडे, गजानन सावंत, भाजपाचे प्रदीप सरोदे, गणेश थोरात, माणिक हाके, नितीन सरोदे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

    Tags