कविता ही दैवी देणगी ! सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर

नांदेड(प्रतिनिधी)मला वाचनासाठी आणि लेखनासाठीही गद्यापेक्षा पद्य हा वाङ्‌मयप्रकार अधिक प्रिय आहे. कारण कविता ही दैवी देणगी असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केले. येथील राजर्षी शाहू विद्यालयात आयोजित लेखनकार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत हे होते.

डॉ. किन्हाळकर पुढे म्हणाल्या की, आई-वडिलांचे आणि गुरूजनांचे वाङ्‌मयीन व भाषिक संस्कार यामुळेच बालवयात साहित्याची गोडी निर्माण झाली. अंतर्मुख स्वभावामुळे लेखनात आणि वाचनात अधिक रमू लागले. त्वचेच्या रंगापेक्षा माणसाचे अंतरंग अधिक महत्त्वाचे असते, असे सांगून त्यांनी त्यासंदर्भात अश्विनी धोंगडे यांची एक कविता सादर केली. मुलींनी कोणत्याही बाबतीत स्वत:ला कमी न लेखता विद्याव्यासंगाच्या बळावर स्वत:ला ज्ञानाच्या क्षेत्रात सिद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राजर्षी शाहू विद्यालयात वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी चाललेल्या बहुविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. बालवयात विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तके वाचावीत, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातील मराठवाडा शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वस्त (कै.) भुजंगराव किन्हाळकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत यांनी मागेल त्याला मागेल ते पुस्तक ह्या उपक्रमाअंतर्गत नुकतीच 16 हजार रूपयांची अवांतर वाचनाची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. जो जे वांछिल तो ते वाचो, ही आमची प्रतिज्ञा आहे, असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. कथा, कविता, गोष्टी, गप्पा, गाणी आणि कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया असा हा प्रवास उलगडत गेला. विद्यार्थ्यांनी थेट प्रश्न विचारून डॉ. किन्हाळकर यांची साहित्यिक वाटचाल समजून घेतली. ही कार्यशाळा म्हणजे वक्ता आणि श्रोते यांच्या दृष्टीने एक आनंदयात्राच ठरली. कस्तुरबा गांधी प्रा.शा.चे मुअ. सूर्यकांत टापरे, आर.एम. कोत्तापल्ले, नागनाथ केंद्रे, एस.एस. बिरादार, राजेश मोरे, बालाजी गर्जे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Photos