वाळू माफियाची शिक्षा थोडासा बदल करून 8 वर्षांनंतर कायम झाली

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)सन 2009 मध्ये एका वाळू माफियाला प्रथम वर्गन्यायदंडाधिकाऱ्याने दिलेली सक्तमजुरीची शिक्षा थोडासा बदल करुन पहिले जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांनी कायम केल्यामुळे त्या वाळू माफियाला तुरुंगाची हवा खावी लागली.

दि.27 ऑक्टोबर 2006 रोजी मुदखेड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार गंगाधर माधवराव बोधमवाड यांनी तक्रार दिली की, दि.8 जून 2006 ते 18 ऑक्टोबर 2006 च्या दरम्यान मुदखेड ते कामळज रस्त्यावर शेत गट क्र.347 जे इरप्पा मठपती यांच्या मालकीचे आहे, तेथे 520 ब्रास वाळू अनाधिकृतपणे आणि बेकायदा साठा केलेली सापडली आहे. तहसील कार्यालयाने केलेल्या चौकशीत ही वाळू टिप्पर क्र.एमआरएल-3992 मध्ये भरुन गोविंदराव राजाराम पवार रा.आमदुरा ता.मुदखेड याने साठविली आहे. या वाळूची किंमत एक लाख रुपये आहे. मुदखेड पोलीस ठाण्यात गौण खनिज महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48 (7) आणि भारतीय दंड विधानाच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक जी.एम.चावरे यांनी त्या प्रकरणी गोविंदराव पवारला अटक केली आणि त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

तत्कालीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आशिष आवारी यांच्यासमक्ष या खटल्याची सुनावणी झाली. पाच साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयात नोंदवले. आणि उपलब्ध पुराव्यावर आधारुन न्यायाधीश आवारी यांनी दि.20 एप्रिल 2009 रोजी गोविंदराव राजाराम पवारला भादंविच्या कलम 379 नुसार दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरुध्द स्थगिती मिळवून गोविंदराव पवारने जिल्हा न्यायालयात अपिल केले. या अपिल प्रकरणात सहायक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी प्राथमिक न्यायालयाने दिलेली शिक्षा कशी योग्य आहे, गौण खनिज ही नैसर्गिक संपत्ती असून अशी चोरी आणि बेकायदेशीर साठवणूक चुकीचे असल्याने गोविंदराव पवारची शिक्षा कायम करावी असा मुद्दा मांडला. नांदेडचे पहिले जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांनी युक्तीवादानंतर गोविंद पवार यांच्या शरीरातील अपंगत्व लक्षात घेता त्याला दिलेली दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा एक वर्षाची केली आणि पाच हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. प्राथमिक न्यायालयाने दंड दिला नव्हता.अपिल प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे वाळू माफिया गोविंदरावराजाराम पवारला सध्या तरी तुरुंगात जावे लागले आहे.

Related Photos