शालेय हस्तलिखितातून उद्याचे लेखक निर्माण होतात - व्यंकटेश चौधरी

भोकर(मनोजसिंह चौव्हाण)लहान विद्यार्थ्यांना संस्कारित करणं हीच शाळेची भूमिका आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या अनेक उपक्रमांमध्ये हस्तलिखित हा महत्त्वाचा उपक्रम आहे. आज हे काम आपणास सामान्य वाटत असेल मात्र अशा हस्तलिखितातूनच उद्याचे प्रतिभावंत लेखक घडत असतात, असे विचार शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी व्यक्त केले. खरबी (ता. भोकर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या *'ज्ञानांकुर'* या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखितिचे प्रकाशन करताना बोलत होते.

शाळेत राबविण्यात येणा-या या विविध उपक्रमांमध्ये गावाचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्या मायबापांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाळेत शिक्षक सदैव धडपडत असतात. त्यांना त्यात आधार देणं हे गावाचं कर्तव्य आहे, असे चौधरी पुढे म्हणाले. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ज्ञानांकुर या हस्तलिखिताचे प्रकाशन व व विद्यार्थ्यांच्या कला गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने व्यंकटेश चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ज्ञानांकुरचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बावनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील यशवंत विद्यार्थ्यांना व्यंकटेश चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.माधव वाघमारे, प्रमुख पाहुणे सरपंच श्री. गंगाधर पाशमवाड, केंद्रप्रमुख श्री.बालाजी कुलकर्णी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.विठ्ठल दुबेवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य केंद्रीय मु.अ.केंद्रे, स.शि. शिवानंद वाडकर आनंदा ढगे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी गावातील महिला जिजाबाई बोरगे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर कांबळे यांनी केले.संपादकीय मनोगत सौ.छाया जोशी(दंडवते) यांनी मांडले. प्रकाशनाचे सूत्रसंचालन सौ.शोभा गोजे यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया जोशी यांनी केले. यावेळी गावातील असंख्य महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने सर्व गावकरी अत्यंत आनंदी झाले.

Related Photos