वसुंधराच्या दूध बोनसमुळे बारड येथील दूध उत्पादकांना दिलासा

नांदेड(प्रतिनिधी)वसुंधारा डेरी प्रकल्पाच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यात आले असून दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली असल्याने उच्च प्रतीचे दूध संस्थेस पुरवठा करण्याचा निर्धार दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

बारड येथील जय श्रीराम दूध उत्पादक संस्थेच्या वतीने दि. 28 फेब्रुवारी 2017 रोजी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच प्रताप देशमुख हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वसुंधारा डेरी प्रकल्पाचे अधिकारी डॉ. अरूण कुलकर्णी, स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद शाखेचे व्यवस्थापक गजानन किडे, पशुवैद्यकीय अधिकारी श्री मठपती, रंगराव देशमुख दूध संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, साहेबराव बापू दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल देशमुख, किसान केंद्राचे मुख्य प्रवर्तक डॉ. किरण देशमुख, किसन देशमुख आमगव्हाणकर, साई समुह गटाचे प्रमुख गजानन देशमुख आदी उपस्थित होते.

जय श्रीराम दूध उत्पादक असोसिएशन संघ स्थापन करण्यात आला आहे. या संघामार्फत अमोल डेरी दूध संस्थेस दररोज दूध पुरवठा केला जातो. वसुंधारा डेरी प्रकल्पास दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना भागीदारीत जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेस दूध पुरवठा वार्षिक उत्पन्नातून मिळणाऱ्या नफ्यातून 3 टक्के रक्कम दूध उत्पादक सदस्यांना बोनसरूपाने वाटप करण्यात येत आहे. सन 2015-16 या वर्षात दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना 89 हजार रूपये बोनस रक्कम वाटप करण्यात आली आहे. वसुंधारा प्रकल्प अधिकारी डॉ. अरूण कुलकर्णी यांच्या हस्ते 56 शेतकऱ्यांना बोनस देण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी जयश्रीराम संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, सचिव विश्वनाथ स्वामी, बालाजी देशमुख, संदीप देशमुख, केदार देशमुख यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन किशन देशमुख यांनी केले तर आभार नामदेव बिच्चेवार यांनी मानले. यावेळी अवधूत शिरगिरे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. बालाजी निलेवार, गोविंद मुपडे, अनिल देशमुख, दिलीप कोरबनवाड, मारोती पिल्लेवाड, रामू डोंगरे, रामेश्वर देशमुख यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Photos