मुदखेड व उमरीतील ऊन्हाळी पिकासाठी पैनगंगेचे पाणी सोडा - आ. वसंत चव्हाण

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)ऊन्हाळी हंगामातील पिकासाठी व जनावरांना पिण्यासाठी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील पाणी मुदखेड व उमरी तालुक्यासाठी सोडण्यात यावी अशी मागणी आ. वसंतराव चव्हाण यांनी नांदेड मंडळाच्या अधिक्षक अभियंत्याकडे केली आहे.

मार्च महीण्यापासूनच ऊन्हाची तिव्रता जाणवू लागल्याने आतापासूनच चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर यंदा ऊन्हाचा पारा जरा जास्तच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने पाणी टंचाईच्या झळाही जाणवण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात वाढलेले अनेक हातपंपाचे व बोअरचे पाणी आता कमी झाले आहे. त्यामुळे यंदाच्या ऊन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. भविष्यातील टंचाईची परिस्थिती व ऊन्हाच्या चटक्याने ऊन्हाळी पिके हाताची जावू नये यासाठी आ. वसंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे.

आ. चव्हाण ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प नांदेड मंडळाचे अधिक्षक अभियंत्याची काल प्रत्यक्ष भेट घेवून संभाव्य पाणी टंचाईची कल्पना दिली व मुदखेड आणि उमरी तालुक्यातील ऊन्हाळी हंगामातील पिकासाठी पाणी सोडणे अत्यंत गरजेचे असल्याची जाणीव करुन दिली. त्याचबरोबर उन्हाची तिव्रता वाढत असल्याने नागरिकाबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होवू शकतो. ही संभाव्य टंचाईची परिस्थिती पाहता पाणी सोडल्यास ऊन्हाळी हंगामातील पिके तर वाचतीलच पण सोडलेले पाणी पिण्यासाठीही उपयोगी पडू शकते त्यामुळे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाणी पाळ्या सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी आ. वसंतराव चव्हाण यांनी केली आहे.

Related Photos