Breaking news

गौण खनिजाचे अनाधिकृत उत्खनन करुन वाळू वाहतुकीसाठी रस्त्याची निर्मिती

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)नायगाव तालुक्यातील गोदावरी नदीतल पाच वाळू धक्क्याच्या लिलाव नुकताच झाला आहे. मात्र या भागातून वाहतूकी साठी रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे मागिल आठ ते दहा दिवसापासून सगळे वाळू ठेकेदार एकत्र येऊन राॅयल्टी न काढताच अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरात रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्याचे समोर आले आहे. आता पर्यंत हजारो ट्रिप या रस्त्यासाठी बेकायदेशीर रित्या गौण खनिज उत्खनन केलेल्या मंडळीवर नायगावचे तहसिलदार कार्यवाही करतील काय? असा सवाल या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

यंदा नायगाव तालुक्यातील आंतरगाव, मनूर, बरबडा, सातेगाव, राहेर या पाच गावातील गोदावरी नदी काठचे वाळूचे ठेके लिलाव पद्धतीने गेले आहेत. मनूर-आंतरगाव ते बरबडा-टाकळी दरम्यानच्या या दहा-बारा किलो मिटर अंतरातील रस्त्यात दरवर्षीच्या बेसुमार वाळू वाहतूकीमुळे मोठमोठाले खड्डे पडले आहेत. रस्त्यात एवढे मोठमोठाले खड्डे पडले आहेत की, या खड्यांतून चार चाकी तर सोडाच साधी दुचाकी ही चालणे दुरापास्त झाले होते. मात्र वरील पाच गावच्या वाळू ठेक्याची वाळू याच रस्त्याने वाहतूक करावी लागणार असल्याने पाच ही ठेक्याचे ठेकेदार एकत्र येऊन प्रशासनाच्या डोळ्यात पद्धतशीरपणे धूळ फेक करत मागील आठ ते दहा दिवसा पासून गौण खनिजाच्या उत्खननाची राॅयल्टी न काढताच सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरात हजारो ट्रिप मुरूमाचा वापर करून रस्ता दुरूस्तीचे काम बिनबोभाट पणे चालू केले आहे. मनूर-आंतरगाव च्या माळावरील अनेक ठिकाणी जेसिबीच्या सहाय्याने मुरूम काढून अनेक ट्रॅक्टर व ट्रकच्या साहय्याने बेसुमार मुरूमाची वाहतूक करण्यात येऊन ज्या- ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या-त्या ठिकाणी मुरूम टाकून जेशिबीने रस्ता दुरूस्त केला जात आहे.

नदीत भरावही घातला जात आहे
.......................
रस्त्याच्या दुरूस्तीसाठी अवैध रित्या उत्खनन केलेल्या मुरूमाचा वापर तर केला जातच आहे. परंतु त्याच बरोबर नदी पात्रातील वाळू बाहेर काढण्यासाठी नदीत व नदीच्या काठावर शेकडो ट्रिप मुरूमाचा वापर करून भरावही घातल्या जात आहे. या बाबत नायगावचे तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्याशी संपर्क करून राॅयल्टी बाबत विचारले असता त्यांनी मला निश्चित काही माहित नाही. त्या भागातील तलाठ्यांकडे चौकशी करावी लागेल असे सांगितले. तलाठी बालाजी राठोड यांना वारंवार फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी रिंग जाऊन ही फोन कट केला.

विशेष म्हणजे पावसाळ्यात मनूर ते आंतरगाव मार्गे बरबडा याच मार्गावर अतिपावसामुळे रस्त्यात खड्डे पडल्यामुळे मुलींना शाळेला घेऊन जाणारी एस. टी. बंद पडल्या मुळे सुमारे दोनशे मुलींना तब्बल आठ किलोमीटर चिखल तुडवित बरबड्यापर्यंत चार महिने पायपीट करावी लागली होती. मात्र या भागात दरवर्षी वाळूचे ठेके घेऊन कोट्यवधी रूपयाचे रस्ते उध्वस्त करणारे वाळू सम्राट मुलीच्या शाळेसाठी रस्ता दुरूस्त करायला पुढे आले नव्हते. नामदेव शिंदे नावाचा एक सर्व सामान्य पालक पुढे येऊन स्वतःची पदरमोड करून रस्ता दुरूस्त करून एस. टी. पूर्ववत सुरू केली होती. आता मात्र वाळू वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सरकारी मदतीची कसलीच वाट न पाहता सगळे जण एकत्र येऊन सुमारे दहा-बारा किलो मिटर अंतरातील रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी सरसावल्याचे पाहून सर्व सामान्य नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, गंगथडीच्या या दुर्लक्षित पट्ट्यात कोणताच अधिकारी येणार नाही हे ओळखून मंडळ अधिकारी व अनुभवी तलाठी महाशयांना हाताशी धरून वाळू तस्करी पूर्वीच शासनाच्या गौणखनिजाच्या महसूल उत्पन्नावर डल्ला मारणा-या या धनदांडग्यावर नायगावचे तहसिलदार कार्यवाही करतील काय या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Photos