स्वस्त धान्य दुकानदारांचे विविध मागण्यासाठी धरणे

नायगाव बाजार(प्रतिनिधी)स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅपकिपर्स फेडरेशनशी संलग्न असलेल्या नायगाव तालुक्यातील सर्व दुकानदारांनी शुक्रवार १७ मार्च रोजी नायगाव तहसील समोर धरणे आंदोलन केले.

नायगाव तालुक्यातील जनतेला शासनाकडून कमी दरात मिळणारे धान्य वाटप करण्यासाठी शासनमान्य १०६ सहा दुकानदार आहेत. त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून यात अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत धान्याचे वाहतुक ही हमाली मुक्त पोच होणे आवश्यक असतांना आजतागायत त्याची अंमलबजावणी झाली नाही. शासनाच्या द्वारपोच योजनेच्या निविदेची रक्कम ही वाहतूक रिबेट म्हणून निविदा मंजूर होत नाही तोपर्यंत देण्यात यावी. सिलींग व वितरणाचे सर्व काम आनलाईन होत असुन त्यास प्रतिकार्ड ५० रूपये घेण्यात येत आहे ते दुकानदारांवर लादू नये. तामिळनाडू प्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करून स्वस्त दान्य दुकानदारांस शासकीय सेवेत सामावून घेऊन दरमहा ३५००० हजार रूपये मानधन देण्यात यावे. येणाऱ्या काळात मशीनवर अगंठा लागल्यानंतरच अन्नधान्य वाटप होणार आहे तरी त्या बायोमेट्रिक मशिनचे प्रशासनाकडून महिनाभर प्रशिक्षण देण्यात यावे. आदी मागण्यांसाठी शुक्रवारी नायगाव तालुक्यातील दुकानदारांनी नायब तहसिलदार शंकर हादेश्वर यांना निवेदन देऊन एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बालाजी येरबडे, दिगांबर वडजे, गणेश पवार, माधवराव हबर्डे, शिवराम जाधव, मारोती भेलोंडे, सुमनबाई धमनवाडे, रामराव पाटील वंजारवाडी, बळीराम बुगुलवाड, मारोती कंदुरके, उत्तम कानोले, माधव सुर्यवंशी, माधव कांडले, यांच्यासह तालुक्यातील सर्व दुकानदार सहभागी झाले होते.

Related Photos