Breaking news

.....तर शिवराय फक्त भोसल्यांचेच राहतील - शिवश्री जगताप

नायगाव बाजार( प्रभाकर लखपत्रेवार)एका काळात छत्रपती शिवराय संपुर्ण जगाचे होते, नंतर भारताचे झाले सिमा वाद व पाणी वादात ते महाराष्ट्राचे झाले, धर्माधर्माच्या वादात हिंदूचे झाले, जाती जातींच्या वादात ते केवळ माराठ्यांपुरतेच उरले आणि त्यातही ९६ कुळी ९२ कुळी पाटील देशमुख यांच्या वादात फक्त शिवराय भोसल्यांचेच राहतील. त्यामुळे शिवरायांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. जाती धर्माच्या चौकटीत बसवून आपण शिवरायांचा इतिहास संपवत आहोत अशी खंत शिवश्री निलेश जगताप यांनी व्यक्त केली.

आ. वसंतराव चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने काल १७ मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. जुन्या नायगाव शहरातून निघालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या मिरवणूकीचा समारोप जनता हायस्कूलच्या मैदानावर झाला. त्यानंतर येथील मैदानावर शिवजयंती निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवराज पा. होटाळकर, प्रा. रविंद्र चव्हाण, सोपान कदम, पोलीस उपनिरिक्षक राहूल वाघ, प्रा. यादव शिंदे, छावाचे तालुकाध्यक्ष प्रताप सोमठाणकर, जे.डी. पाटील व डाँ. शिवाजी कागडे यांची उपस्थिती होती तर व्याख्याते शिवश्री निलेश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना जगताप म्हणाले की, आज सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा होत असला तरी छत्रपतींचा इतिहास समजून घ्यायला कुणीही तयार नाही. शिवाजी महाराजांना डोक्यावर घेवून नाचतो पण डोक्यात घ्यायला आपण तयार नाहीत. छत्रपतींच आष्टपैलू व्यक्तीमत्व होत आपण त्यांच्यातील एक गुण घेतला तरी आपल्या जीवनाच सार्थक होत पण तस करायला कुणीही तयार नाही. त्यामुळे हातातील तलवार जावून आमच्या मुलांच्या हातात सिगारेट आली आणि त्याचा धुर काढतायेत, आटकेपार झेंडे रोवणारा मराठी तरुण आता अकटेपार झेंडे लावायला जात नाही कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेवू असा प्रश्न त्याला पडला आहे. घोड्याच्या टापाच्या आवाजावर थिरकणारे मावळे आता डि जे च्या आवाजावर थिरकत आहेत. औरंगजेबाच्या मातीत जावून त्याला सडवणारा महाराष्ट्र आता कोणत्याही औरंगजेबाला सडवायला जात नाही कारण आमच्या पोरांची जबडे गुटख्यामुळे कधी सडून गेली हे त्यांच त्यानांच कळल नसल्याची शोकांतिका व्यक्त करुन छत्रपतीपासून प्रेरणा घेवून राज्यात घराघरात शिवराय घडवायचे असतील तर शिवचरित्र समजून घेतले पाहीजे. सध्याच्या राजकारणावर भाष्य करतांना सरकार कुणाचही असो पण सर्वच पक्षाचे राजकारणी एकदुस-याच्या हातात हा घालून आपण सर्व भाऊ भाऊ मिळेल ते वाटून खाऊ म्हणतात आणि उरले तर घराकडे घेवून जावू व जनतेला मात्र लुटतच राहू अशी मानसिकता झाली असल्याची टिकाही यावेळी त्यांनी केली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उध्दव ढगे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. यादव शिंदे यांनी मांडले.

Related Photos