नायगाव व धर्माबादसाठी अर्थसंकल्पात २० कोटीची तरतूद - आ. वसंतराव चव्हाण

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)नायगाव विधानसभा मतदार संघासाठी ३० कोटीच्या निधीची मागणी केलेली असतांना २० कोटीचीच अर्थसंकल्पात शासनाने तरतुद केली. त्यामुळे विकासकामांना खिळ बसणार असून. रस्ते दुरुस्तीसाठीच्या निधीत शासनाने कपात केली असल्याने आमदारात नाराजीचा सुर आहे अशी माहीती आ. वसंतराव चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

दरवर्षीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या वेळी आपापल्या मतदार संघातील विकास कामासाठी प्रत्येक आमदार शासनाकडे प्रस्ताव पाठवत असतो. यंदा नायगाव विधानसभा मतदार संघाचे आ. वसंतराव चव्हाण यांनी नायगाव विधानसभा मतदार संघासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तालुक्यातील पुलांच्या व राज्य रस्ते आणि जिल्हा मार्गाची सुधारणा करणे गरजेचे असल्याने त्यासाठी ३० कोटीची कामे प्रस्तावित केली असून २०१७ च्या अर्थसंकल्पात समाविष्ठ करण्यात यावी अशी मागणी २४ जानेवारी आणि २४ फेब्रुवारी २०१७ रोजी केली होती. मात्र शासनाने 'अन्युवल मेंअटनंस काँन्ट्रक्ट' या नावाखाली नायगाव व धर्माबाद या दोन तालुक्यासाठी २० कोटीचीच अर्थसंकल्पात तरतुद केली आहे.

आ. वसंतराव चव्हाण यांच्या शिफारशीवरुन राज्याच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात एकूण २६ कामांचा समावेश केला असून राज्यशासनाने काढलेल्या पुस्तकात या कामाचा समावेश आहे. विशेष म्हणजे आ. चव्हाण यांनी मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत २००८, अतिरिक्त अर्थसंकल्प २००९ व डिसेंबर २०१३ ला पुरवणी मागण्याच्या वेळी प्रस्तावित केलेल्या काही कामांचाही अर्थसंकल्पात समावेश केला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पुर्वी नाबार्डमधून रस्ते विकासासाठी निधी दिला जात असतांना यंदा नाबार्डचा निधी इतरत्रच वळवण्यात आला आहे. शासनाच्या या धोरणामुळे रस्ते विकासाला खिळ बसणार आहे.

शासनाने यंदा मतदार संघ निहाय रस्ते दुरुस्तीसाठी फार कमी तरतुद केली असून आमदारांनी केलेल्या शिफारशींनाही कात्री लावली असतांना एका जिल्हा परिषद सदस्याच्या प्रतिनीधीला कसा निधी मिळेल अशी टिका आ. चव्हाण यांनी राजेश पवार यांच्यावर केली आहे. आमदारांच्याच शिफारशीवरुन राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतुद होत असते पण काहीजन आमदारांनी प्रस्तावित केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आणि सवंग लोकप्रियतेसाठी प्रसिध्दी करुन घेत असल्याचा टोलाही लगावला. कहाळा, सोमठाणा, कोलंबी, मांजरम,गडगा, व कुंटूर, सांगवी, मेळगाव, धनंज, राहेर हुस्सा या रस्त्याची पुलासह दुरुस्ती करण्यासाठी १५ कोटीची मागणी केली होती. त्याचबरोबर नायगावसह उमरी व धर्माबाद तालुक्यातील राज्य व जिल्हा मार्गाच्या दुरुस्तीसाठी १५ कोटीच्या निधीची अर्थसंकल्पात तरतुद करण्याची मागणी केली होती असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

Related Photos