LOGO

जलयुक्त शिवार अभियानातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

अनिल मादसवार - 2017-05-19 16:22:01 - 130

नांदेड,  राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या महत्वकांक्षी योजना आहेत. या योजनेची कामे संबंधीत यंत्रणांनी येत्या पावसाळ्यापूर्वी नियोजनपूर्वक पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहात जलयुक्त शिवार अभियान व मग्रारोहयो कामांची आढावा बैठक श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एम. कांबळे, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू तसेच वने, सामाजिक वनीकरण, कृषि आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांच्या प्रगतीचा आढावा घेवून श्री. डोंगरे म्हणाले की, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे व गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजना आहेत. या योजनांच्या कामांना अधिक गती देवून येत्या 15 जून पर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दयावे. शेतकऱ्यांच्या हिताची गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेत स्थानिकांचा सहभागासाठी त्यांना प्रोत्साहित करावेत. संबंधीत यंत्रणांनी कामांचा नियमित आढावा घेऊन या कामांना अधिकाधिक गती देवून ही कामे पूर्ण करावीत , असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 व सन 2016-17 मधील यंत्रणानिहाय कामांच्या आढावा बरोबर, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी अभिनव योजना आहे. जिल्ह्यात लोकसहभाग व शेतकऱ्यांच्या सहकार्यातून ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी जलयुक्त शिवार अभियान व उपजिल्हाधिकारी (रोहयो)  बी. एम. कांबळे यांनी मग्रारोहयो अंतर्गत जिल्ह्यातील विविध कामांची माहिती दिली.  

Tag:
Download our mobile app here :

Contact us

C/O Utkarsh PhotoGallary,
Narsinha Digital photo,
Rukhmini Nagar, At.Post.& Tq.Himayatnagar
Dist. Nanded. Pin - 431802.

+91 9764010107, +919767121217, +919420538747.

02468-244739

anilmadaswar@gmail.com,
nandednewslive@gmail.com,

Back to Top