हजूर साहेब - पटना विशेष रेल्वे यात्रे गाडीच्या बुकींग बाबत खुलासा करावा

नांदेड(प्रतिनिधी)हजूर साहेब ते हरिमंदर साहेब पटना या विशेष रेल्वे यात्रेच्या टिकीट नोंदणीत मोठ्या प्रमाणात गडबडघाई करण्यात आली असून मोठ्या संख्येत भाविकांना टिकीटांपासून वंचित राहावे लागत आहे. एकाच दिवसात पूर्ण गाडीची बुकींग कशी करण्यात आली या विषयी गुुरुद्वारा बोर्डाने खुलासा करावा अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेचे उप जिल्हा प्रमुख स.जगदीपसिंघ नंबरदार यांनी एका पत्राद्वारे गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. तारासिंघ यांच्या कडे केली आहे.

वरील विषयी अधिक माहिती अशी की, श्री गुरु गोबिंदसिंघ जी महाराज यांच्या 350 व्या जन्मोत्सव वर्षा निमित्त गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डातर्फे एका विशेष रेल्वे यात्रे आयोजन करण्यात आले असून येत्या ता. 18 मई, 2017 रोजी ही विशेष रेल्वे यात्रा नांदेड रेल्वे स्टेशन येथून निघणार आहे. वरील यात्रे विषयी गुरुद्वारा सचखंड बोर्ड कार्यालय तर्फे स्थानिक शीख भाविकांना टिकटांची नोंदणी करण्यासाठी आव्हान ही करण्यात आले होते. त्यानुसार ता. 20 फेब्रुवारी, 2017 ते ता. 20 मार्च, 2017 पर्यंत रेल्वे टिकटांची बुकींग करण्यात येईल असे एक पत्रक घरोघरी पोहचविण्यात आले होते. पण प्रत्यक्षात जेव्हा भाविकांनी पहिल्या दिवशी टिकीटांसाठी गुरुद्वारा कार्यालयात संपर्क साधला तेव्हा सर्वांची घोर निराशा व्हायला सुरुवात झाली आणि टिकट संपले असे उत्तर देण्यात येत होते. दुसर्‍या दिवशी तर टिकीट संपले अशी घोषणा देखील करण्यात आली व वेटींग लिस्टसाठी नावें लिहून द्या असे उत्तर मिळत होते.

वरील परिस्थिती पाहता शंका उपस्थित होत आहे की एकाच दिवसात जवळपास तेराशे टिकीटांची बुकींग कशी झाली व ती कोणत्या पध्तिनीने करण्यात आली. आज तारखेला ही जवळपास 1200 भाविकांची वेटींग लिस्टवर नावे सादर आहेत. तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश येथून ही भाविकगण सतत आपली नावे नोंदविण्या बाबत आग्रह धरत आहेत. असंख्य भाविकांची अशी इच्छा आहे कि गुरुद्वारा बोर्डाने विशेष रेल्वे यात्रेच्या टिकीट नोंदणीत झालेल्या गडबडी विषयी खुलासा करावा. तसेच वेटींग लिस्ट मध्ये असलेल्या भाविकांसाठी दुसरी विशेष रेल्वे यात्रा त्याच गाडीसोबत काढण्यात यावी.

Related Photos