वाट खाचखळग्याची हे आत्मचरित्रातील मैलाचा दगड - डॉ. जगदीश कदम

नांदेड(प्रतिनिधी)दलित साहित्यामध्ये आत्मचरित्राला महत्त्वाचे स्थान असून व्ही.पी. ढवळे यांच्या वाट खाचखळग्याची या आत्मचरित्राने मोलाची भर घातली आहे. या आत्मकथनातून केवळ एका व्यक्तीचे चरित्र उभे राहात नसून तत्कालिन समाजजीवनाचे, व्यवस्थेचे चित्रण लेखकाने तटस्थपणाने आणि तेवढ्याच प्रांजळपणाने केलेले आहे. वाट खाचखळग्याची हे आत्मचरित्र मैलाचा दगड ठरेल असे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांनी केले.

समाजकल्याण विभागात दीर्घकाळ सेवा केलेले अधिकारी व्ही.पी. ढवळे यांनी लिहिलेल्या वाट खाचखळग्याची या आत्मचरित्राचे प्रकाशन हॉटेल चंद्रलोक येथे डॉ. जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, प्रा. रविचंद्र हडसनकर, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. बबन जोगदंड, डॉ. करूणा जमदाडे हे उपस्थित होते. आरंभी प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. स्वागतपर भाषणात लेखक व्ही.पी. ढवळे यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आपण हे आत्मचरित्र लिहिले असून आयुष्यात आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांचा पट या ग्रंथात उभा केला आहे, असे सांगितले. डॉ. जगदीश कदम पुढे बोलताना म्हणाले, की दलित आत्मचरित्रामध्ये नोंद घेतली जाईल, असे हे आत्मचरित्र असून लेखकाने भोगलेल्या दु:खाचे, कष्टाचे वास्तव चित्रण या चरित्रातून रेखाटले गेलेले आहे. ज्ञानपिपासूवृत्ती असल्यामुळे लेखकाने आपल्या कर्तृत्वाने शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यामुळे हे आत्मचरित्र तरूणांना प्रेरणादायी ठरेल, असे आहे. प्रा. हडसनकर यांनी आत्मचरित्राविषयी गौरवोद्‌गार काढून लेखकाने विविध साहित्य प्रकारात लेखन करावे, असे सूचविले. डॉ. गोणारकर यांनी आत्मचरित्रातील सामर्थ्याच्या जागा सांगून हे आत्मचरित्र कसे वेगळे आहे, हे उदाहरणासह पटवून दिले.

प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे म्हणाले, की आत्मचरित्रातून अनेक गोष्टी आपणास कळू शकतात. व्यक्तीची जडणघडण कशी झाली आहे, हे तर समजतेच त्याशिवाय त्या काळातील समाजजीवन कसे होते, हे सुद्धा आपणास कळू शकते. ढवळे यांच्या आत्मचरित्रातून शिक्षण घेऊन उच्च पदावर गेलेल्या व्यक्तीने समाजासाठी कशापद्धतीने कार्य करायचे असते याचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे, असे सांगितले. डॉ. करूणा जमदाडे यांनी ढवळे आपल्या जवळचे नातेवाईक असून त्यांनी आपल्या केवळ कुटुंबालाच घडविले नाही, तर समाजातील आडल्यानडलेल्यांना आधार दिला. सर्वतोपरी सहकार्य केले, असे सांगितले.

याप्रसंगी लेखक व्ही.पी. ढवळे यांचा विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महापालिकेचे उपायुक्त प्रकाश येवले, भीमराव जमदाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंढेकर, माजी मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी.आर. कदम, गटविकास अधिकारी इंगोले, घोडके, व्ही.आर. पाटील, डॉ. साहेबराव ढवळे, व्ही.एन. सोनकांबळे, तोटावाड, वसंत मैया, रामोड यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भीमराव तलवाडे यांनी केले तर आभार प्रभाकर ढवळे यांनी मानले.

Related Photos