लाच प्रकरणातील फरार पोलिसाला अटकपूर्व जामीन फेटाळला

तुरुंगात असणाऱ्या पोलिसाला अटींवर जामीन दिला
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)एका युवकाची स्कुटी पकडून पैसे नसल्यामुळे त्याचा मोबाईल स्वतःकडे ठेवून मोबाईल देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी फरार असलेल्या पोलीस चालकाला अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्याचे आदेश विशेष न्यायाधीश आनंद यावलकर यांनी जारी केले आहेत. या प्रकरणातील अटक होवून तुरुंगात असलेल्या पोलीस आरोपीला न्यायाधीशांनी काही अटींवर जामीन मंजूर केला आहे.

नांदेड शहरातील विश्रामगृहाच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर 5 मार्च रोजी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या पोलीस शिपाई संतोष बन्सी राठोडला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले होते. त्या प्रकरणात पोलीस गाडी क्र.एमएच-26-आर-0402 चा चालक भाऊराव हरी पवार हा सुध्दा आरोपी होता. पण तो फरार झाला होता. त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यात सरकारी वकील ऍड.नितीन कांगणे यांनी कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने असे कृत्य हे करणे म्हणजे तो प्रकार एखाद्या व्यक्तीविरुध्द नसून तो सामाजिक गुन्हा आहे. म्हणून त्यास अटकपूर्व जामीन देवू नये असा युक्तीवाद मांडला. सेाबतच आवाजाचा नमुना अटकेत असताना घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे, असा मुद्दा ऍड.कागणे यांनी मांडला. भाऊराव पवारच्या वतीने हा चालक आहे, त्याच्यापेक्षा अटकेत असलेला पोलीस संतोष राठोड याचे पद मोठे आहे तो सांगेल तेथे गाडी घेवून जाणे एवढेच भाऊराव पवारचे काम आहे असा युक्तीवाद मांडण्यात आला. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश यावलकर यांनी भाऊराव हरी पवारचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात 5 मार्चला अटक झालेला पोलीस कर्मचारी संतोष बन्सी राठोड हा दोन दिवस पोलीस कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्या वतीने नियमित जामीन मिळावी असा अर्ज करण्यात आला. त्या अर्जावर तुरुंगातून सुटल्यावर मी आवाजाचा नमुना देणार आहे असे सांगण्यात आल्याने न्यायाधीशांनी सुटल्याबरोबर प्रथमतः आवाजाचा नमुना द्यावा ही अट संतोष राठोडवर टाकून त्यास जामीन मंजूर केला आहे.

Related Photos