Breaking news

स्वारातीम विद्यापीठात 'भाषांतर: सिध्दांत आणि व्यवहार' या विषयावर चर्चासत्र

नांदेड(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 'भाषांतर :सिध्दांत आणि व्यवहार' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्त्राचे आयोजन करण्यात आले आहे. २० आणि २१ मार्च रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या चर्चासत्राचे भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल हे आयोजक आहेत. जागतिकीकरणोत्तर काळात भाषांतर क्षेत्रातील संधी आणि सिध्दांतन या संदर्भाने दोन दिवस सखोल विचारविनिमय करण्यात येणार असल्याची माहिती संकुलाचे संचालक प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांनी दिली.

भारत देश हा बहुभाषिक देश असून जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजी भाषेकडे ज्ञाननिर्मितीची अधिसत्ता एकवटली आहे. अनुदान क्षेत्र केवळ ज्ञान प्रचार आणि प्रसारापुरते मर्यादित राहिले नसून ते एक व्यवसाय म्हणून नावारूपास आले आहे. अनुदान क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत. पण त्याविषयीचे उपयोजनात्मक ज्ञान त्यांच्याकडे नाही. संस्थात्मक व स्वतंत्ररित्या या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना केवळ एकापेक्षा अनेक भाषा येऊन उपयोग नाही, तर अनुवाद क्षेत्रातील बारकावे आणि कौशल्य आत्मसाथ करता यायला हवीत. अनुदान क्षेत्राचे ज्ञान व या काळात त्या ज्ञानाचे अद्ययावतीकरण होणे गरजेचे आहे. आणि यासाठी प्रस्तुत चर्चासत्र या काळात अधिक उपयुक्त आणि दिशादर्शक ठरणारे आहे.

हैद्राबाद येथील इंग्लीश आणि फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटीच्या माजी प्र-कुलगुरू आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुवादक डॉ. माया पंडित यांच्या हस्ते चर्चासत्राचे उदघाटन करण्यात येणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अनुवादक डॉ. सूर्यनारायण रणसुभे हे समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. डॉ. वंदना महाजन (मुंबई विद्यापीठ), डॉ. अवंतिका शुक्ला (महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा), डॉ. नीना गोगटे (स्वा.रा.ती. मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), डॉ. शिवदत्त वाव्हळकर (एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालय, पुणे), डॉ. लोकेश मालती प्रकाश (भोपाळ), डॉ. सोनाली कुलकर्णी (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद), डॉ. दीपक बोरगावे (पुणे), डॉ. महादेव देशमुख (सोलापूर), डॉ. गणेश मोहिते (बीड), डॉ. महेश लीला पंडित (मुंबई) यांच्यासह विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक विविध सत्रामध्ये विषयाची मांडणी करणार आहेत.

या चर्चासत्रात ''अनुवाद : स्थानिकीकरण आणि जागतिकीकरण'', ''अनुवाद व समकालीन भारतीय साहित्य'', ''अनुवाद : अपहार व प्रतिकार'', ''अनुवाद आणि लोकसाहित्य'', ''अनुवाद आणि बालसाहित्य'', अनुवाद : नव-सैद्धांतिक दृष्टीकोन'', ''अनुवाद आणि ज्ञाननिर्मिती'' असे विषय निश्चित केले आहेत. संकुलातील विद्यार्थ्यांचे यावेळी प्रत्यक्ष अनुवादावर आधारलेले पोस्टर प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. डॉ. माया पंडित यांनी जीणं आमुचं', 'आयदान', 'अधांतर', 'गुलामगिरी' या कलाकृतींचे इंग्रजी अनुवाद केले आहेत. तर डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी 'अक्कलमाशी', 'उचल्या', 'आठवणींचे पक्षी', 'साक्षीपुराम', 'अश्मक' या कलाकृतींचे हिंदी अनुवाद केले आहेत. या दोन ज्येष्ठ अनुवादकांशी थेट संवाद साधण्याची संधी चर्चासत्राच्या निमित्ताने मिळणार आहे. या चर्चासत्राला उपस्थित राहावे, असे आवाहन चर्चासत्राचे समन्वयक डॉ. नीना गोगटे आणि संयोजक सचिव डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आले.

Related Photos