एकस्व (पेटंट) ही आपली मौल्यवान संपत्ती - कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

नांदेड(प्रतिनिधी)संशोधनाला खूप महत्व आहे. त्याही पेक्षा महत्व संशोधनाच्या एकस्वला आहे. आपण केलेले संशोधन हे फक्त आपल्याच मालकीचे आहे. हे फक्त एकस्वद्वारे सिध्द होते. म्हणून एकस्व ही आपली मौल्यवान संपत्ती आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

ते आज गुरुवार, दि.१६ मार्च रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये महाराष्ट्र शासनांतर्गत राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान (रुसा) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने इंटेलेक्च्युअर प्रॉपर्टी राईट्स (पेटंट) या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई येथील पेटंट अँड ट्रेंड मार्कचे सल्लागार डॉ. गोपाकुमार नायर, पुणे येथील राष्ट्रीय केमिकल प्रयोगशाळेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भास्कर इडगे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, समन्वयीका डॉ. वाणी लातूरकर, डॉ. शैलेश वाढेर आणि डॉ. सी. एन. खोब्रागडे यांची उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, या कार्यशाळेत पेटंट कशावर करावयाचे आहे. याबरोबरच पेटंटसाठी काय करावयाचे नाही हे पण शिकणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करूनही शेवटी कळतेकी याचे पेटंट होत नाही. आणि मग संशोधक हिरमुसतो. पेटंट ही आपली बौध्दीक संपत्ती आहे. तिचा कुणीही गैर वापर करू शकत नाही. याबाबतचे सर्व प्रशिक्षण या एक दिवशीय कार्यशाळेत आपणास देण्यात येणार आहे. जोपर्यंत आपल्या संशोधनाचे पेटंट होणार नाही तोपर्यंत त्याला महत्व येणार नाही.

डॉ. वाणी लातूरकर यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितले की, भारतामध्ये सर्वात जास्त पेटंट महाराष्ट्राच्या नावावर आहेत. इतर राज्यापेक्षा आपले राज्य पेटंट बाबतीत खूप जागरूक आहे, हे यावरून दिसून येते. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरप्रीतकौर रंधावा यांनी केले तर आभार डॉ. सी. एन. खोब्रागडे यांनी मानले.

Related Photos